KKR vs RCB : कोलकाताकडून बेंगलोरचा २१ धावांनी पराभव | पुढारी

KKR vs RCB : कोलकाताकडून बेंगलोरचा २१ धावांनी पराभव

बंगळूर; वृत्तसंस्था : जेसॉन रॉय-नितीश राणाची 83 धावांची तडाखेबंद सलामी व सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेलच्या भेदक मार्‍याच्या बळावर केकेआरने यजमान आरसीबीचा अक्षरश: एकतर्फी धुव्वा उडवला. प्रारंभी, केकेआरने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 5 बाद 200 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात आरसीबीला 20 षटकांत 8 बाद 179 धावांवर समाधान मानावे लागले. (KKR vs RCB)

विजयासाठी 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीने 37 चेंडूंत 6 चौकारांसह सर्वाधिक 54 धावांचे योगदान दिले. मात्र, त्यांचे आघाडी फळीतील अन्य तीन फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. फाफ डू प्लेसिस (17), शाहबाज अहमद (2) व तडाखेबंद फलंदाजीची क्षमता असलेला ग्लेन मॅक्सवेल (5) अतिशय स्वस्तात बाद झाले. या पडझडीमुळे आरसीबीची 5.5 षटकांत 3 बाद 58 अशी स्थिती झाली होती.

पाचव्या स्थानी फलंदाजीला आलेल्या महिपाल लोमरोरने 18 चेंडूंत जलद 34 धावा फटकावल्या. मात्र, वरुणने त्याला डीप मिडविकेटवरील रसेलकडे झेल देणे भाग पाडले. विराट कोहली पाचव्या गड्याच्या रूपाने बाद झाला, त्यावेळी आरसीबीला सर्वात मोठा धक्का सोसावा लागला.

यावेळी आरसीबीचा संघ 12.1 षटकांत 5 बाद 115 अशा स्थितीत होता. त्यानंतर सुयश 10 धावांवर धावचित झाला तर हसरंगाला 5 धावांवर तंबूत परतावे लागले. विली (नाबाद 11) व विजयकुमार (नाबाद 13) क्रीझवर असताना हा सामना आरसीबीच्या हातातून सुटला होता. अंतिमत: केकेआरने 21 धावांनी बाजी मारली.

केकेआरतर्फे वरुण चक्रवर्तीने 27 धावात 3 तर सुयश शर्मा व आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

रॉय-राणाची फटकेबाजी

तत्पूर्वी, सलामीवीर जेसॉन रॉय (29 चेंडूंत 56) व कर्णधार नितीश राणाच्या (21 चेंडूंत 48) झंझावाती फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 5 बाद 200 धावांचा डोंगर रचला. जेसॉन रॉयच्या खेळीत 4 चौकार व 5 षटकार तर राणाच्या खेळीत 3 चौकार व 4 षटकारांचा समावेश राहिला.

या लढतीत आरसीबीने नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआरला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. जेसॉन रॉय व एन. जगदीशन यांनी 9.2 षटकांत 83 धावांची तडाखेबंद सलामी दिली. जगदीशनला दहाव्या षटकात विजयकुमारने डीप मिडविकेटवरील विलीकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. पाचच धावांच्या अंतराने जेसॉन रॉय देखील विजयकुमारच्या भेदक यॉर्करवर त्रिफळाचीत झाला.

नितीश राणा अर्धशतकापासून अवघ्या दोन धावांनी वंचित राहिला. तिसर्‍या स्थानावरील वेंकटेश अय्यरने पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. हसरंगाच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने त्याचा झेल टिपला. अय्यरच्या 26 चेंडूंत 31 धावांतील खेळीत 3 चौकारांचा समावेश राहिला होता.

हेही वाचा;

Back to top button