Mumbai Indians : शेवटच्या ४ षटकांतील स्वैर गोलंदाजीचा फटका | पुढारी

Mumbai Indians : शेवटच्या ४ षटकांतील स्वैर गोलंदाजीचा फटका

अहमदाबाद; वृत्तसंस्था : शेवटच्या 4 षटकांत 70 धावा लुटू दिल्याने याचा आपल्या संघाला मोठा फटका बसला, असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सविरुद्ध नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर रोहित शर्मा पत्रकार परिषदेत बोलत होता. ही लढत येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आली. (Mumbai Indians)

मुंबई इंडियन्सला शेवटच्या काही षटकांत सातत्याने झगडावे लागत आले असून यापूर्वी पंजाब किंग्जविरुद्ध देखील त्यांना शेवटच्या 5 षटकांत 96 धावा मोजाव्या लागल्या होत्या. माझ्या मते हे खूपच निराशाजनक आहे. वास्तविक, शेवटची काही षटके बाकी असताना आमचे सामन्यावर उत्तम वर्चस्व होते. मात्र, शेवटच्या काही षटकांत सारे समीकरण बिघडून गेले. आमची रणनीती तयार होती. पण, त्याची अंमलबजावणी झाली नाही, असे रोहितने पुढे सांगितले. (Mumbai Indians)

समोरचा फलंदाज कोण आहे, त्याची बलस्थाने काय आहेत, कमकुवत बाजू काय आहेत, याचा सारासार विचार करून गोलंदाजी करणे आवश्यक होते. प्रत्येक संघाविरुद्ध स्वतंत्र रणनीती अमलात आणावी लागते. ते आम्ही करू शकलो नाही. आमची फलंदाजी आघाडी मजबूत आहे. पण, आघाडीचे काही फलंदाज स्वस्तात बाद झाले तर मध्यफळीवर दडपण येते आणि यातून सावरणे प्रत्येक वेळी शक्य नसते, याचाही रोहितने उल्लेख केला.

गुजरातविरुद्ध लढतीत आमची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नाही, हे मान्य करावेच लागेल. आमची फलंदाजी सुरू असताना खेळपट्टीवर दव होते. त्यामुळे, एकवेळ फलंदाजी उत्तम झाली असती तर आम्ही धावांचा यशस्वी पाठलाग केलाही असता. मात्र, आमची सुरुवात अपेक्षेनुरूप झाली नाही आणि 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना याचा निश्चितपणाने फटका बसतो, असे रोहित एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला. गुजरातविरुद्ध या लढतीत विजयासाठी 208 धावांचे आव्हान असताना मुंबईला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 152 धावांवर समाधान मानावे लागले.

दरम्यान, गुजरात टायटन्सचा विजयी कर्णधार हार्दिक पंड्याने या निकालानंतर संघाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. नेतृत्व साकारताला मला पूर्वनियोजन करणे फारसे पसंत असत नाही. पूर्वनियोजन करण्याऐवजी मी समोर परिस्थिती असेल, त्याप्रमाणे निर्णय घेणे पसंत करतो. याबाबत आमचे प्रशिक्षक आशिष नेहराशी एकमत असते. 99 टक्के वेळा माझा व त्यांचा निर्णय एकच असतो, असेही तो म्हणाला.

हेही वाचा;

Back to top button