Premier League : लिसेस्टर सिटीची लीडस् युनायटेडविरुद्ध बरोबरी

Premier League : लिसेस्टर सिटीची लीडस् युनायटेडविरुद्ध बरोबरी
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्था : लिसेस्टर सिटीचा अनुभवी स्ट्रायकर जेमी व्हर्डीने प्रदीर्घ कालावधीपासून चालत आलेला गोलचा दुष्काळ अखेर संपुष्टात आणला आणि लीडस् युनायटेडविरुद्ध 1-1 अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली. लीडस्चा संघ या लढतीत लुईस सिनिस्टेराने 20 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे प्रदीर्घ काळ आघाडीवर होता. मात्र, 70 व्या मिनिटाला मैदानावर आलेल्या 36 वर्षीय व्हर्डीने गोलजाळ्याचा अचूक वेध घेत संघाला महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली. (Premier League)

व्हर्डीसाठी हा ऑक्टोबरनंतर पहिलाच गोल ठरला. संघाला बरोबरी मिळवून दिल्यानंतर काहीच मिनिटांत त्याने आणखी एक गोल केला. पण, यावेळी ऑफसाईड देण्यात आल्याने त्याची व संघाचीही निराशा झाली. लिसेस्टरचा गोलरक्षक डॅनिएल इव्हर्सनने मार्क रोकाचा अगदी जवळून मारलेला हेडरचा फटका यशस्वीरीत्या थोपवला तर लीडस्चा स्ट्रायकर पॅट्रिक बॅमफोर्डने गोल नोंदवण्याची नामी संधी गमावली होती. (Premier League)

या सामन्यानंतर लिसेस्टरचा संघ 29 गुणांसह 17 व्या स्थानी असून तळाहून तिसर्‍या स्थानी असलेल्या इव्हर्टनपेक्षा ते एका गुणाने आघाडीवर आहेत. इव्हर्टनने गुरुवारी न्यू कॅसल युनायटेडविरुद्ध पराभव टाळला तर ते क्रमवारीत थोडी सुधारणा करू शकतील. सध्या लीडस्च्या खात्यावर 30 गुण आहेत. तळाहून दुसर्‍या स्थानी असलेल्या नॉटिंगहम फॉरेस्टने बि—टॉनविरुद्ध विजय मिळवला तर बरीच समीकरणे बदलू शकतात.

व्होल्वजला स्वयंगोलाचा लाभ

या स्पर्धेतील अन्य एका लढतीत व्होल्वज वांडरर्सने क्रिस्टल पॅलेस संघाला 2-0 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. जोकिम अँडरसनने तिसर्‍याच मिनिटाला स्वयंगोल केल्याने व्होल्वजला विनासायास आघाडी प्राप्त झाली तर कर्णधार रुबेन नेव्हेसने स्टॉपेज टाईममध्ये पॅलेसचा गोलरक्षक सॅम जॉनस्टोनकडून झालेल्या चुकीचा लाभ घेत व्होल्वजची आघाडी आणखी भक्कम केली.

या विजयासह व्होल्वज संघाने पॅलेसशी बरोबरी साधली असून हॉजसनच्या संघाची 3 विजय व 1 बरोबरीची अपराजित मालिकादेखील खंडित केली.

अ‍ॅस्टॉन व्हिलाची पाचव्या स्थानी झेप

डिफेंडर मिंग्जने अप्रतिम हेडरवर गोल केल्यानंतर अ‍ॅस्टॉन व्हिलाने फुलहॅमवर 1-0 अशी निसटती मात करत गुणतालिकेत पाचवे स्थान प्राप्त केले. व्हिलाचा संघ 33 सामन्यांत 54 गुणांवर असून टॉटेनहम हॉटस्परपेक्षा ते एका गुणाने आघाडीवर आहेत तर चौथ्या स्थानावरील मँचेस्टर युनायटेडविरुद्ध पाच गुणांनी पिछाडीवर आहेत. फुलहॅमला मार्च व एप्रिलमधील 4 पराभवाचा मोठा फटका बसला असून सध्या ते 45 गुणांसह नवव्या स्थानी आहेत.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news