RCB vs KKR : कोलकाताचे बेंगलोरला २०१ धावांचे आव्हान | पुढारी

RCB vs KKR : कोलकाताचे बेंगलोरला २०१ धावांचे आव्हान

बंगळूर; वृत्तसंस्था : सलामीवीर जेसॉन रॉय (29 चेंडूत 56) व कर्णधार नितीश राणाच्या (21 चेंडूंत 48) झंझावाती फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीविरुद्ध आयपीएलच्या साखळी सामन्यात निर्धारित 20 षटकांत 5 बाद 200 धावांचा डोंगर रचला. जेसॉन रॉयच्या खेळीत 4 चौकार व 5 षटकार तर राणाच्या खेळीत 3 चौकार व 4 षटकारांचा समावेश राहिला.

या लढतीत आरसीबीने नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआरला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. जेसॉन रॉय व एन. जगदीशन यांनी 9.2 षटकांत 83 धावांची तडाखेबंद सलामी दिली. जगदीशनला दहाव्या षटकात विजयकुमारने डीप मिडविकेटवरील विलीकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. पाचच धावांच्या अंतराने जेसॉन रॉय देखील विजयकुमारच्या भेदक यॉर्करवर त्रिफळाचीत झाला.

नितीश राणा अर्धशतकापासून अवघ्या दोन धावांनी वंचित राहिला. तिसर्‍या स्थानावरील वेंकटेश अय्यरने पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. हसरंगाच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने त्याचा झेल टिपला. अय्यरच्या 26 चेंडूंत 31 धावांतील खेळीत 3 चौकारांचा समावेश राहिला. आंद्रे रसेल एका धावेवर त्रिफळाचीत झाला. रिंकू सिंग व डेव्हिड विझ यांनी शेवटच्या षटकात फटकेबाजी करत 15 धावा वसूल केल्या. रिंकूने 10 चेंडूत नाबाद 18 तर विझने 3 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 12 धावा फटकावल्या.
आरसीबीतर्फे हसरंगा व विजयकुमार यांनी प्रत्येकी 2 तर मोहम्मद सिराजने 33 धावांत 1 बळी घेतला.

हेही वाचा;

Back to top button