Jofra Archer Injury : जोफ्रा आर्चरचे 25 महिन्यांत 5 वे ऑपरेशन, MI चे ठोके वाढले

Jofra Archer Injury : जोफ्रा आर्चरचे 25 महिन्यांत 5 वे ऑपरेशन, MI चे ठोके वाढले

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jofra Archer Injury : आयपीएल मधील मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी फारशी समाधानकारक राहिलेला नाही. याचे कारण संघातील प्रमुख खेळाडूंची दुखापत हे आहे. या यादीत जोफ्रा आर्चरच्या रूपाने आणखी एक नाव जोडले गेले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्चरची (Jofra Archer Injury) या महिन्याच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया झाली होती. पण ही दुखापत पुन्हा बळावली असल्याचे समजते आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो फिटनेसशी झुंजत आहे. त्याची नुकतीच झालेली शस्त्रक्रिया ही गेल्या 25 महिन्यांतील पाचवी शस्त्रक्रिया आहे, असल्याचे समजते आहे.

याचा परिणाम एमआयच्या आगामी मोहिमेवर होऊ शकतो. संघ व्यवस्थापनाने आर्चरला तंदुरुस्त घोषित केले असले तरी 25 एप्रिल रोजी एमआयच्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. सामन्यापूर्वी रोहितने तो फिट नसल्याचे सांगितले होते. अशा परिस्थितीत आर्चरच्या फिटनेसवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. आर्चरच्या दुखापतीची स्थिती पाहिल्यानंतर तो बहुतांश सामने खेळू शकणार नाही, असा दावा केला जात आहे.

'द टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार, आर्चरला (Jofra Archer Injury) अलीकडेच आयपीएलदरम्यान उजव्या कोपरात वारंवार दुखू लागले होते. या कोपराच्या दुखापतीमुळे तो गेली दोन वर्षी खेळापासून दूर होता. 2021 च्या सुरुवातीलाही त्याला स्ट्रेस फ्रॅक्चरचा त्रास सहन करावा लागला. यानंतर तो टी-20 विश्वचषक आणि ॲशेस मालिकेसारख्या अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये खेळू शकला नाही.

ईसीबीने बुधवारी एक निवेदन जारी करून सांगितले की, 'आर्चर काही आठवड्यांपूर्वी वैद्यकीय उपचारांसाठी बेल्जियमला ​​गेला होता. त्यानंतर तो थेट आयपीएलमधील एमआय संघात सामील झाला होता.'

कोपर आणि पाठीच्या दुखापतीमुळे सुमारे दोन वर्षांच्या अनुपस्थितीनंतर आर्चरने या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र, त्याचे पुनरागमन प्रभावी ठरले नाही. तो अजूनही फॉर्म परत मिळवण्यासाठी धडपडत आहे.

मुंबई इंडियन्सला आर्चर पडला महागात

आयपीएलच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरवर (Jofra Archer Injury) मोठी रक्कम खर्च केली. त्याने या गोलंदाजाला 8 कोटींमध्ये खरेदी केले होते. मात्र, त्याचा फारसा फायदा झालेला नाही. गेल्या मोसमात आर्चर दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही, तर यावेळीही त्याचा फिटनेस मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरला आहे.

आर्चरने खेळले केवळ दोन सामने

यंदाच्या हंगामात आतापर्यंत आर्चरने केवळ दोनच सामने खेळले असून त्यात त्याने एक विकेट घेतली आहे. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 9.38 राहिला आहे. त्याला संघाच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. केवळ आर्चरच नाही तर संघाचा अन्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचीही अशीच अवस्था आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news