T20 World Cup : हार्दिकसह तिघेे ‘डेंजर झोन’मध्ये - पुढारी

T20 World Cup : हार्दिकसह तिघेे ‘डेंजर झोन’मध्ये

दुबई ; वृत्तसंस्था : आगामी टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचा ‘आयपीएल-2021’मधील फॉर्म हा निवड समितीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी आयपीएलमधील अखेरच्या साखळी सामन्यांत फटकेबाजी करून फॉर्म मिळवला. परंतु, हार्दिक पंड्या, राहुल चहर, भुवनेश्वरकुमार यांचा फॉर्म अजूनही परतलेला नाही.

त्यात हार्दिकची तंदुरुस्ती ही संघासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. अशात बीसीसीआयने आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणार्‍या तीन खेळाडूंना यूएईमध्ये थांबवण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याकडे हार्दिकची ‘रिप्लेसमेंट’ म्हणून पाहिले जात आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा गोलंदाज हर्षल पटेल कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू व्यंकटेश अय्यर आणि शिवम मावी यांना थांबण्यास सांगितले आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हर्षलने 15 सामन्यांत 32 विकेटस् घेत ‘पर्पल कॅप’ आपल्या नावावर केली आहे.

हर्षलने या कामगिरीसह आयपीएलच्या एकाच पर्वात सर्वाधिक 32 विकेटस् घेण्याचा ड्वेन ब्राव्हो याच्या विक्रमाशी बरोबरी केली. व्यंकटेशही चांगल्या फॉर्मात आहे आणि शिवमही उत्तम कामगिरी करीत आहे. भारतीय संघ 15 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करू शकतो आणि बीसीसीआयनेही शुक्रवारपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

भारताचा टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धेतील पहिला सामना 24 ऑक्टोबरला होणार आहे आणि पहिला सामना खेळण्याच्या 7 दिवस आधी संघात बदल केला जाऊ शकतो. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक याने आयपीएलमध्ये गोलंदाजी केलेली नाही आणि फलंदाजीतही त्याला फार कमाल करता आली नाही. सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज उम्रान मलिक याची बीसीसीआयने ‘नेट बॉलर’ म्हणून निवड केली आहे.

एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार हर्षल, व्यंकटेश व शिवम यांनाही थांबण्यास सांगितले जाऊ शकते. ‘सपोर्ट कालावधीच्या सात दिवस आधी संघात बदल करता येऊ शकतो. टीम इंडियाचा सपोर्ट कालावधी 23 तारखेला सुरू होणार आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत संघात बदल करण्याची मुभा आहे,’ असे सूत्रांनी सांगितले.

‘हार्दिकला वगळण्याचा निर्णय झालेला नाही; पण तो झाल्यास शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर यांचा मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो. त्यात निवड समिती हर्षल पटेलला यूएईत थांबण्यास सांगू शकते,’ असेही सूत्रांनी सांगितले.

Back to top button