MI vs SRH : मुंबईचे हैदराबादला १९३ धावांचे आव्हान | पुढारी

MI vs SRH : मुंबईचे हैदराबादला १९३ धावांचे आव्हान

हैदराबाद; वृत्तसंस्था : मुंबईने हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 192 धावा केल्या. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली; तर तिलक वर्माने 16 चेंडूंत 37 धावा चोपत स्ट्राईक रेट वाढवून दिला. हैदराबादकडून जान्सेनने 2 फलंदाज बाद केले. ईशान किशननेही 38 धावांचे योगदान दिले.

सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम मुंबईला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. रोहित शर्मा आणि ईशान किशनने मुंबई इंडियन्सला आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, फटकेबाजी करणार्‍या रोहित शर्माला नटराजनने बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. रोहितने 18 चेंडूंत 28 धावा केल्या.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ईशान किशनने कॅमेरून ग्रीनसोबत मुंबईला 87 धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, त्यानंतर मार्को जान्सेनने ईशानला 38 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्याने एक षटकार मारला; मात्र 7 धावांवर तो बाद झाला. त्याचीही शिकार जान्सेननेच केली.

यानंतर ग्रीनला साथ देण्यासाठी आलेल्या तिलक वर्माने हैदराबादला तडाखे देण्यास सुरुवात केली. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, ग्रीन सावध फलंदाजी करत होता. या दोघांनी मुंबईला 17 व्या षटकात 150 पार पोहोचवले. मात्र, 16 चेंडूंत 37 धावा केल्यानंतर तिलक वर्मा भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, ग्रीनने 33 चेंडूंत अर्धशतक गाठले. यानंतर ग्रीनच्या जोडीला त्याच्याच देशाचा टीम डेव्हिड आला. त्याने सेट होण्यास जादा वेळ न दवडता फटकेबाजीला सुरुवात केली. दोघांच्या प्रयत्नांमुळे मुंबईने 20 षटकांत 192 धावा केल्या. डेव्हिड शेवटच्या चेंडूवर धावचित झाला.

हेही वाचा;

Back to top button