Nehal Wadhera : डेब्यू सामन्यात 101 मीटरचा षटकार! MI च्या नेहल वढेराचा धमाकेदार विक्रम | पुढारी

Nehal Wadhera : डेब्यू सामन्यात 101 मीटरचा षटकार! MI च्या नेहल वढेराचा धमाकेदार विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सकडून (mumbai indians) आयपीएलमध्ये पदार्पण करणा-या 22 वर्षीय नेहल वढेराने (nehal wadhera) कोहलीच्या आरसीबी (RCB) विरुद्ध चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात दोन षटकार ठोकले. त्यातील एक षटकार इतका लांब फटकावला की सगळे बघतच राहिले.

चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबईने 8.5 षटकांत 48 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू तंबूत परतल्यानंतर 22 वर्षीय नेहल वढेरा (Nehal Wadhera) फलंदाजीसाठी मैदानात उतरला.

आरसीबीकडून कर्ण शर्मा (Karna Sharma) 14 वे षटक टाकत होता. स्ट्राईकवर नेहल होता. कर्णने षटकातील चौथा चेंडू फेकला. खेळपट्टीवर चेंडूचा टप्पा पडताच नेहलने (Nehal Wadhera) आक्रमक अवतारात तो लाँग-ऑनवरून थेट स्टेडियमच्या छतावर भिरकावला. या उत्तुंग षटकाराची लांबी चक्क 101 मीटर नोंदवली गेली.

मात्र, याच षटकाच्या पुढच्या चेंडूवर कर्ण शर्माने नेहलला बाद केले आणि दोन षटकारांचा बदला पूर्ण केला. खरेतर नेहलचे आयपीएल पदार्पण चाहत्यांना माहीत नव्हते. मात्र त्याने अल्पावधीतच आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली. नेहलने एका टोकाला टिलक वर्माला साथ देत ​​13 चेंडूंत 2 षटकारांसह 21 धावा केल्या. आयपीएल 2023 मध्ये 100 मीटर किंवा त्याहून लांब षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने सात विकेट्सवर 171 धावा केल्या, प्रत्युत्तरात आरसीबीने 16.2 षटकात दोन गडी गमावून 172 धावा करत सामना जिंकला.

4 सप्टेंबर 2000 रोजी पंजाबच्या लुधियाना येथे जन्मलेला नेहाल वढेरा हा भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाचा सदस्य आहे. तो पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. या वर्षी जानेवारीमध्ये त्याने पंजाबकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पंजाबसाठी 5 सामन्यांच्या 7 डावात त्याने 53.71 च्या सरासरीने 376 धावा केल्या ज्यात 2 शतकांचा समावेश आहे.

रणजी पदार्पणात शतक

त्याने गुजरातविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावून रणजी कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात केली. यानंतर मोहालीत मध्य प्रदेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने द्विशतक झळकावले. या सामन्यात त्याने 214 धावांची खेळी खेळली. फलंदाजीसोबतच नेहाल वढेरा लेगस्पिन गोलंदाजीही करतो.

Back to top button