RRvsSRH : राजस्थानचा ‘आरंभ है प्रचंड’ | पुढारी

RRvsSRH : राजस्थानचा ‘आरंभ है प्रचंड’

हैदराबाद; वृत्तसंस्था : आयपीएलच्या पहिल्या सत्राचा विजेता असलेल्या राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलचा प्रारंभही प्रचंड विजयाने केला. रविवारी झालेल्या दुपारच्या सामन्यात राजस्थानने सनरायजर्स हैदराबाद संघावर 72 धावांनी मोठा विजय मिळवला. हैदराबादला आधी जोस बटलर (54), यशस्वी जैस्वाल (54) आणि संजू सॅमसन (55) यांनी फलंदाजीत धमाका केला तर नंतर ट्रेंट बोल्ट (2 विकेटस्), यजुवेंद्र चहल (4 विकेटस्) यांनी गोलंदाजीत तडाखा दिला. राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 बाद 203 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देणारा हैदराबादचा संघ 131 धावांत गळपाटला. (RRvsSRH)

राजस्थान रॉयल्सचे विजयासाठीचे 204 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादसाठी पॉवर प्लेचे पहिलेच षटक हे एका वाईट स्वप्नाप्रमाणे ठरले. बोल्टने तिसर्‍या चेंडूवर अभिषेक शर्माला बाद केले. त्यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठी शून्यावर बाद झाला. यामुळे पहिल्याच षटकात हैदराबादची अवस्था 2 बाद 0 धावा अशी झाली. यातून हैदराबाद संघ सावरलाच नाही. त्यांना पॉवर प्लेमध्ये 2 बाद 30 धावाच करता आल्या. (RRvsSRH)

पॉवर प्लेमध्ये मंदावलेल्या हैदराबादला नंतरही उभारी घेता आली नाही. बोल्टनंतर यजुवेंद्र चहल, आर. अश्विन आणि जेसन होल्डर यांनी हैदराबादच्या फलंदाजीला एका मागून एक धक्के देण्यास सुरुवात केली. यामुळे हैदराबादची अवस्था 6 बाद 52 धावा अशी झाली. अब्दुल रशिदने तडकाफडकी 18 धावा केल्या, पण त्यालाही चहलने बाद केले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या अब्दुल समद (32) आणि उमरान मलिक (19) यांनी शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे हैदराबादला शंभरी गाठता आली. शेवटी त्यांचा डाव 8 बाद 131 धावांवर थांबला.

तत्पूर्वी, आयपीएल 2023 च्या चौथ्या सामन्यात हैदराबादने आपल्या होम ग्राऊंडवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राजस्थान रॉयल्सच्या तगड्या फलंदाजीने हा निर्णय त्यांच्यावरच उलटला.

यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यशस्वी वेगाने धावा कुटताना दिसला. वॉशिंग्टन सुंदरच्या पहिल्याच षटकात बटलरने सलग दोन खणखणीत षटकार खेचले आणि त्यात यशस्वीनेही हात धुवून घेतले. त्या षटकात 19 धावा चोपल्या. बटलर-यशस्वीला रोखण्यासाठी भुवनेश्वरकुमार सातत्याने गोलंदाजीत बदल करताना दिसला, पण त्याचे प्रयोग अपयशी ठरत होते.

टी नटराजनच्या पहिल्या षटकात 4,0,4,4,4,1 अशा 17 धावा आल्या. फजहल फारूकीच्या षटकात बटलरने 3 चौकार खेचून 20 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, पाचव्या षटकात फारूकीने भन्नाट चेंडू टाकून बटलरच्या बेल्स उडवल्या. बटलर 22 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 54 धावांवर माघारी परतला अन् यशस्वीसह त्याची 85 धावांची (35 चेंडू) भागीदारी संपुष्टात आली. पॉवर प्लेमध्ये राजस्थानने 1 बाद 85 धावा केल्या आणि ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. पॉवर प्लेमध्ये बटलरने तिसर्‍यांदा 50+ धावा करताना ख्रिस गेलशी बरोबरी केली. या विक्रमात डेव्हिड वॉर्नर (6) अव्वल स्थानी आहे.

त्यानंतर जैस्वालने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यानेदेखील अर्धशतकी मजल मारत संजू सॅमसनच्या साथीने संघाला 136 धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, फारूकीने जैस्वालला देखील बाद करत दुसरा सलामीवीर टिपला. यानंतर संजू सॅमसनने 28 चेंडूंत अर्धशतकी खेळी करत राजस्थान रॉयल्सला 17 व्या षटकात 172 धावांपर्यंत पोहोचवले. उमरान मलिकने देवदत्त पडिक्कलला आणि टी. नटराजनने रियान परागला बाद करत राजस्थानला धक्के दिले. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची 32 चेंडूंत केलेली 55 धावांची खेळी अखेर 19 व्या षटकात नटराजनने संपवली. अखेर हेटमायरने 16 चेंडूंत 22 धावा ठोकत राजस्थानला 203 धावांपर्यंत पोहोचवले.

हेही वाचा; 

Back to top button