Mumbai : धारावीत ख्रिस्त बांधवांकडून पाल्म संडेनिमित्त मिरवणूक | पुढारी

Mumbai : धारावीत ख्रिस्त बांधवांकडून पाल्म संडेनिमित्त मिरवणूक

धारावी : पुढारी वृत्तसेवा : पाल्म संडे निमित्ताने धारावीतील शेकडो प्रभू येशू भक्तांनी हातात नारळाच्या झाडाच्या झावळ्या घेऊन होसन्ना प्रभू येशू मसीहा की जय…, बोला ख्रिस्त महाराज की जय…. अशा घोषणा देत आपल्या पारंपरिक पद्धतीने रविवारी सकाळी मिरवणूक काढली. मिरवणुकीचे आयोजन धारावीत नव्वद फूट रस्त्यावरील गांधी मैदान येथील इंडियन ख्रिश्चन असेम्बली चर्चचे पास्टर सी चेल्लदुरई यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी चर्चमध्ये उपस्थित शेकडो भक्तांनी प्रभू येशू ख्रिस्ताची मनोभावे सामूहिक प्रार्थना केली. यामुळे चर्चमधील वातावरण चांगलेच भक्तिमय झाले होते. प्रार्थना पूर्ण होताच नारळाच्या झाडाच्या झावळ्यासह प्रभू येशू ख्रिस्ताच्या जयघोषाचे फलक हातात घेऊन शेकडो ख्रिस्तीबांधव, महिला, युवक, युवती मुला-मुलींसह मिरवणुकीत सहभागी झाली. दरम्यान येशूच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला. यावेळी एका रांगेत येशूचे नामस्मरण करत निघालेल्या मिरवणुकीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

धारावी नव्वद फूट रस्त्यावरून संत रोहिदास मार्गे संत कक्कया मार्गाहून रॅली धारावी कामराजर हाईस्कूल जवळून आपल्या गंतव्यस्थानी प्रभू येशूच्या नावाचा जप करत निघाली. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर एकच गर्दी उसळली होती. आजच्या दिवशी रोमन सत्तेच्या गुलामगिरीतून पीडितांना मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने जेरुसलेम शहरात प्रवेश केला. यावेळी पीडितांनी नारळाच्या झाडांच्या झावळ्या घेऊन होसन्ना- होसन्ना अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले तेव्हापासून हा त्यांच्या मधूर आठवणींचा दिवस म्हणून साजरा केला जात असल्याचे एका भक्ताने सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button