Rashid Khan ICC Ranking: पाकिस्तानची जिरवून राशिद खान बनला नंबर-1 टी-20 गोलंदाज!

Rashid Khan ICC Ranking: पाकिस्तानची जिरवून राशिद खान बनला नंबर-1 टी-20 गोलंदाज!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rashid Khan ICC Ranking : अफगणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान आयसीसी टी-20 च्या गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाला मागे टाकून अव्वल स्थानी बाजी मारली आहे. नुकतेच राशिदच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने पाकिस्तान संघाला टी-20 मालिकेत लोळवले. त्यांनी ही मालिका 2-1 ने जिंकून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या यशानंतर अफगाणिस्तानच्या तीन खेळाडूंनी टॉप-10 मध्ये उडी घेतली आहे.

24 वर्षीय राशीद खान यापूर्वी 2018 मध्ये टी-20 तील अव्वल गोलंदाज बनला होता. तो क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. शारजाहमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने 3 बळी घेतले. या दरम्यान, त्याचा इकॉनॉमी रेट उत्कृष्ट राहिला. प्रत्येक सामन्यात त्याने पाकिस्तानच्या खेळाडूंचा धुव्वा उडवला. याचा फायदा राशिदला असून तो आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत टॉप गोलंदाज म्हणून पुन्हा विराजमान झाला. (Rashid Khan ICC Ranking)

राशीदने अलीकडेच अनोखा विक्रम केला होता. टी-20 मध्ये एकही चौकार न खाता सलग 100 वा चेंडू टाकणारा तो गोलंदाज बनला होता. पण पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात हा क्रम खंडित झाला.

राशिदची आयपीएलमधील कामगिरी

राशीद खान हा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा उपकर्णधार आहे. आयपीएलमधील त्याची कामगिरी अप्रतिम आहे. राशिद हा विकेट घेण्यापेक्षा किफायतशीर गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने 92 सामन्यात 112 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याने 6.38 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली आहे. आपल्या स्पेल दरम्यान तो फार कमी धावा खर्च करतो. त्यामुळे समोरच्या संघावर दडपण निर्माण होते आणि ते आपली विकेट गमावतात. राशीदला गेल्या वर्षी गुजरात टायटन्स संघाने विकत घेतले होते. यापूर्वी तो सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएल खेळला आहे. (Rashid Khan ICC Ranking)

हसरंगा देणार राशीदला आव्हान

राशीदनंतर फजलहक फारुकी 692 रेटिंगसह टी-20 गोलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापाठोपाठ मुजीब उर रहमान 668 रेटिंगसह आठव्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या हसरंगाचे 695 रेटिंग आहेत आणि आगामी काळात तो पुन्हा पहिल्या स्थानासाठी राशीदसमोर आव्हान निर्माण करू शकतो. इतर गोलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर जोश हेझलवूड, पाचव्या क्रमांकावर आदिल रशीद आणि सहाव्या क्रमांकावर अॅडम झम्पा यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news