Lionel Messi Goal : मेस्सीचा चमत्कार! फुटबॉलमध्ये ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू | पुढारी

Lionel Messi Goal : मेस्सीचा चमत्कार! फुटबॉलमध्ये ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lionel Messi Goal : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपला मास्टरक्लास जगाला दाखवून दिला. अर्जेंटिना आणि कुराकाओ यांच्यात अर्जेंटिनामध्ये मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळला गेला. अर्जेंटिना संघाने हा सामना 7-0 असा जिंकला. या सामन्यात मेस्सीने आपले कौशल्य दाखवून अर्जेंटिनाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याचबरोबर त्याने एक मोठा विक्रमही केला.

मेस्सीची हॅट्ट्रीक, 100 वा आंतरराष्ट्रीय गोल (Lionel Messi Goal)

फिफा क्रमवारीत 86 व्या स्थानावर असलेल्या कुराकाओ संघाविरुद्ध लिओनेल मेस्सीने धडाकेबाज कामगिरी केली. त्याने सामन्यात एकूण तीन गोल करून पूर्वार्धातच आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. यासह त्याने जागतिक फुटबॉलमधील आपले 100 गोलचा टप्पाही पार केला. (Lionel Messi Goal)

मेस्सीने अर्जेंटिनाचे खाते उघडले

मेस्सीने 20 व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल केला. लो सेल्सो याने दिलेल्या पासवर चेंडूला गोलजाळ्यात धाडले. यानंतर अवघ्या तीनच मिनिटांनी निकोलस गोन्झालेझने (23) संघाची आघाडी दुप्पट केली. 33व्या मिनिटाला मेस्सीने आपला वैयक्तीक दुसरा गोल केला आणि संघाची आघाडी 3-0 ने वाढवली. यानंतर एन्झो फर्नांडिसने 35 व्या मिनिटाला गोलफरक 4-0 पर्यंत पोहचवला.

यानंतर मेस्सीने 37 व्या मिनिटाला आपला तिसरा आणि अर्जेंटिनासाठी पाचवा गोल केला. 78 व्या मिनिटाला डी मारियाने पेनल्टीचे रुपांतर गोलमध्ये केले, तर 87 व्या मिनिटाला गोन्झालो मॉन्टिएलने गोलकरोन अर्जेंटिनाला 7-0 ने विजय मिळवून दिला.संपूर्ण सामन्यात अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी चेंडूवर ताबा ठेवला. मेस्सीच्या खेळाने कुराकाओ संघावर सुरुवातीपासूनच दडपण आणले. अर्जेंटिनाचा हा सलग दोन सामन्यांतील दुसरा विजय आहे.

100 हून अधिक गोल करणारा तो तिसरा फुटबॉलपटू

जागतिक फुटबॉलमध्ये 100 हून अधिक गोल करणारा तो तिसरा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याच्या नावावर आता एकूण 102 गोल झाले आहेत. जागतिक फुटबॉलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर सर्वाधिक गोल आहेत. त्याने 122 गोल केले आहेत. त्यानंतर इराणचा अली देई याचा क्रमाक लागतो. त्याने 109 गोल केले आहेत.

मेस्सीने रचला इतिहास

मेस्सी हा फुटबॉल विश्वचषकाचे विजेतेपद आणि आंतराष्ट्रीय सामन्यांत 100 गोल एकमेव खेळाडू बनला आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सला मात देऊन फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यातील 2 गोलसह एकूण स्पर्धेत त्याने 7 गोल केले. त्याच्या या चमकदार खेळामुळे मेस्सीला गोल्डन बॉलचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Back to top button