IPL 2023 KKR : ‘केकेआर’ला मोठा धक्का, नितीश राणा जखमी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 KKR : आयपीएलचा 16 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या (केकेआर) अडचणी वाढतच चालल्या आहेत. एकामागून एक संघाचे खेळाडू जखमी होत आहेत. आता संघाचा आघाडीचा फलंदाज नितीश राणा जखमी झाला असून आठवडाभरात खेळाडू जखमी होण्याची ही तिसरी वेळ आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (IPL 2023 KKR) 2 एप्रिलपासून पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पण त्यापूर्वीच संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. श्रेयस अय्यर आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या दुखापतीनंतर आता फलंदाज नितीश राणालाही दुखापतग्रस्त झाला आहे.
गुरुवारी ईडन गार्डन्सवर सराव सत्रादरम्यान नितीश राणा जखमी झाला. त्यामुळे केकेआरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सरावादरम्यान एक चेंडू नितीशच्या घोट्याला लागला. दुखापत झाल्यानंतर तो सुमारे पाच मिनिटे जमिनीवर पडून होता. यावेळी त्याला असहाय्य वेदना होत होत्या. त्यानंतर नितीशने काही वेळातच मैदान सोडले. मात्र, त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यापूर्वी, कोलकाता नाइट रायडर्सचा (IPL 2023 KKR) वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघाचा भाग असणार नाही. तो 26 मार्चला कोलकात्याला पोहोचणार होता पण आता त्याला येण्यास उशीर होणार आहे. दुसरीकडे केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरही पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामात संघाचा भाग असणार नाही.
अशातच अय्यरच्या अनुपस्थितीत संघाचे कर्णधारपद कोणाकडे सोपवायचे याचा पेच निर्माण झाला आहे. यासोबतच संघातील अनेक मोठे खेळाडू दुखापती आणि इतर कारणांमुळे सातत्याने संघातून बाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीत कोलकात्यासाठी हा मोसम आव्हानांनी भरलेला असणार आहे.