Kapil Dev: सूर्याची तुलना संजू सॅमसनशी नको, कपिल देव यांचा शशी थरूर यांना सल्ला! | पुढारी

Kapil Dev: सूर्याची तुलना संजू सॅमसनशी नको, कपिल देव यांचा शशी थरूर यांना सल्ला!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kapil Dev : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत अपयशी ठरला. या मालिकेतील तिन्ही सामन्यांत तो पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्याच्या या खराब प्रदर्शनाने अनेकांना धक्का बसला. अशातच त्याच्या टीम इंडियातील स्थानावरून क्रिकेट आणि राजकीय वर्तुळात जोरदर चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस खासदार शशी थरूर (shashi tharoor) यांनी अप्रत्यक्षपणे सूर्यकुमार यादवच्या (suryakumar yadav) जागी संजू सॅमसनचा (sanju samson) प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. मात्र, विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी सूर्याची पाठरखण करत सूर्यकुमारला अजून संधी मिळायला हवी. त्याची तुलना संजूशी करणे योग्य नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले.

सूर्याचे समर्थन करताना कपिल देव (Kapil Dev) म्हणाले, ‘चांगला खेळ करणाऱ्या क्रिकेटपटूला नेहमीच अधिक संधी मिळतात. सूर्यकुमार यादवची तुलना संजू सॅमसनशी करू नका. हे योग्य नाही. जर संजू सॅमसन खराब फॉर्ममध्ये असेल तर त्यावेळी तुम्ही दुसऱ्या एका खेळाडूला संधी द्यावी अशी मागणी कराल का?’ असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘जर संघ व्यवस्थापनाने सूर्याला अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याला संधी मिळणे आवश्यक आहे. लोक खेळाडूच्या अपयशावरून टीका करतील. पण शेवटी संघ व्यवस्थापनाने अंतिम निर्णय घेतला आहे, हे लक्षात ठेवावे,’ असेही कपिल देव (Kapil Dev) यांनी म्हटले.

फलंदाजीतील बदलामुळे सूर्याचे नशीब बदलले नाही आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही तो शून्यावर बाद झाला. चेन्नईतील शेवटच्या वनडेत त्याला सातव्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते. अनेक माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांना वाटते की, फॉर्ममध्ये नसलेल्या फलंदाजाला अगदी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणे योग्य चाल नव्हती, कारण त्यामुळे सूर्याच्या आत्मविश्वासाला धक्का बसण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माने केली सूर्याची पाठराखण

मालिका गमावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सूर्याची पाठराखण केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीनही सामन्यांमध्ये सूर्या तीन सर्वोत्तम चेंडूंवर बाद झाल्याची त्याने प्रतिक्रिया दिली. तिसऱ्या सामन्यात सूर्याने चुकीचा शॉट निवडला. त्याला मी ओळखतो, तो फिरकीपटूंविरुद्ध चांगली फलंदाजी करतो. त्यामुळेच त्याला राखून ठेवण्यात आले होते, जेणेकरून तो शेवटच्या 15-20 षटकांमध्ये मुक्तपणे खेळू शकेल. पण तो आल्याआल्याच बाद झाला. हे कुणासोबतही होऊ शकते, पण सूर्याकडे गुणवत्ता आणि क्षमता आहे,’ असेही हिटमॅनने सांगितले होते.

Back to top button