IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय | पुढारी

IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय

चेन्नई; वृत्तसंस्था : जिंकता जिंकता सामना कसा हरायचा, याची प्रचिती भारताने पुन्हा एकदा दाखवून दिली. कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिका जिंकून चाहत्यांचा पाडव्याचा गोडवा वाढवण्याची संधी भारताने गमावली. चेन्नई येथे झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी विजय मिळवून मालिका 2-1 अशी आपल्या नावावर केली. या पराभवाने आयसीसीच्या वन-डे क्रमवारीतील अव्वल स्थानही भारताने गमावले. चेननईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तिसर्‍या एकदिवसीय सामन्यातही फलंदाजांनी अवसानघातकी कामगिरी केली. त्यामुळे हातात आलेला विजय भारताने सोडला. भारताचा डाव 248 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने तिसरा एकदिवसीय सामना 21 धावांनी जिंकून मालिका 2-1 ने जिंकली. 4 विकेटस् घेणार्‍या अ‍ॅडम झम्पा याला सामनावीर तर मिचेल मार्श याला मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला. (IND vs AUS 3rd ODI)

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली होती. विराट कोहलीने अर्धशतक झळकावले आणि सामना भारताच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली होती, पण कोहली अनावश्यक फटका मारून बाद झाला आणि सामना फिरला. कोहली बाद झाल्यावर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी काही काळ किल्ला लढवला खरा, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्यामुळे भारताला हा सामना 21 धावांनी गमवावा लागला. या सामन्यासह भारताला मालिकाही गमवावी लागली आहे.

भारतापुढे ऑस्ट्रेलियाच्या संघाने 270 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात करून दिली होती, पण रोहित शर्मा यावेळी 30 धावांवर बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. रोहित बाद झाल्यावर काही वेळातच गिलही 37 धावांवर बाद झाला. दोन्ही सलामीवीर बाद झाले असले तरी विराट कोहलीने यावेळी भारताचा डाव चांगलाच सावरला.

कोहलीने राहुलच्या मदतीने यावेळी अर्धशतकी भागीदारी रचली आणि भारताला विजयाचे स्वप्न दाखवले, पण राहुल 32 धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली, पण विराट मात्र खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. कोहलीने यावेळी आपले अर्धशतक झळकावले आणि भारतीय संघ विजयाच्या दिशेने कूच करत होता, पण त्याचवेळी कोहलीनेे अ‍ॅश्टन अ‍ॅगरला एक मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. कोहलीने यावेळी 72 चेंडूंत 54 धावांची दमदार खेळी साकारली. कोहली बाद झाला आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव पुढच्याच चेंडूवर बाद झाला. सलग तिसर्‍यांदा या मालिकेत तो गोल्डन डक (पहिल्याच चेंडूवर बाद) झाला. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी काही काळ फलंदाजी केली खरी, पण या दोघांनाही भारताला विजय मिळवून देता आला नाही. त्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला आणि मालिकाही त्यांच्या हातून निसटली.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज ट्रेविस हेड आणि मिचेल मार्शने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात केली. दोघांनीही 66 धावांची भागिदारी रचल्यानंतर हार्दिक पंड्याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर हार्दिकच्या गोलंदाजीने कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पण ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिस आणि अ‍ॅलेक्स केरीने सावध खेळी करून ऑस्ट्रेलियाला 200 धावांच्या आसपास पोहोचवले. त्यानंतर एबॉट (26) आणि एगरच्या (17) धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 250 धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाने 49 षटकांत सर्वबाद 269 धावा केल्या.

धावफलक

ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड झे. कुलदीप यादव गो हार्दिक पंड्या 33, मिचेल मार्श त्रि. गो. हार्दिक पंड्या 47, स्टिव्ह स्मिथ झे. के. एल. राहुल गो. हार्दिक पंड्या 0, डेव्हिड वॉर्नर झे. हार्दिक पंड्या गो. कुलदीप यादव 23, मार्नस लॅबुशेन झे. शुभमन गिल गो. कुलदीप यादव 28, अ‍ॅलेक्स केरी त्रि. गो. कुलदीप यादव 38, मार्कस स्टॉयनिस झे. शुभमन गिल गो. अक्षर पटेल 25, सीन अ‍ॅबॉट त्रि. गो. अक्षर पटेल 26, अ‍ॅश्टन अ‍ॅगर झे. अक्षर पटेल गो. मोहम्मद सिराज 17, मिचेल स्टार्क झे. रवींद्र जडेजा गो. मोहम्मद सिराज 10, अ‍ॅडम झम्पा नाबाद 10. अवांतर : 12. एकूण 49 षटकांत सर्वबाद 269. गडी बाद क्रम : 1/68, 2/74, 3/85, 4/125, 5/138, 6/196, 7/203, 8/245, 9/247, 10/269. गोलंदाजी : मोहम्मद शमी 6-0-37-0, मोहम्मद सिराज 7-1-37-2, अक्षर पटेल 8-0-57-2, हार्दिक पंड्या 8-0-44-3, रवींद्र जडेजा 10-0-34-0, कुलदीप यादव 10-1-56-3.

भारत  : रोहित शर्मा झे. मिचेल स्टार्क, सीन अ‍ॅबॉट 30, शुभमन गिल पायचित गो. अ‍ॅडम झम्पा 37, विराट कोहली झे. डेव्हिड वॉर्नर गो. अ‍ॅश्टन अ‍ॅगर 54, के. एल. राहूल झे. सीन अ‍ॅबॉट गो. अ‍ॅडम झम्पा 32, अक्षर पटेल धावचित 2, हार्दिक पंड्या झे. स्टिव्ह स्मिथ गो. अ‍ॅडम झम्पा 40, सूर्यकुमार यादव त्रि. गो. अ‍ॅश्टन अ‍ॅगर 0, रवींद्र जडेजा झे. मार्कस स्टॉयनिस गो. अ‍ॅडम झम्पा, 18, कुलदीप यादव धावचित 6, मोहम्रमद शमी त्रि. गो. मार्कस स्टॉयनिस 14, मोहम्मद सिराज नाबाद 3. अवांतर : 12. एकूण 49.1 षटकांत सर्वबाद 248. गडी बाद क्रम : 1/65, 2/77, 3/146, 4/151, 5/185, 6/185, 7/218, 8/225, 9/243, 10/248. गोलंदाजी :मिचेल स्टार्क 10-0-67-0, मार्कस स्टॉयनिस 9.1-0-43-1, सीन अ‍ॅबॉट 10-0-50-1, अ‍ॅडम झम्पा 10-0-45-4, अ‍ॅश्टन अ‍ॅगर 10-0-41-2.

 

हेही वाचा;

Back to top button