IND vs AUS ODI : ‘वन-डे’त ऑस्ट्रेलियाचे पारडे जड; वर्चस्व राखण्याचे भारतापुढे आव्हान | पुढारी

IND vs AUS ODI : ‘वन-डे’त ऑस्ट्रेलियाचे पारडे जड; वर्चस्व राखण्याचे भारतापुढे आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया आता वन-डे मालिकेत एकमेकांना भिडणार आहेत. पहिला सामना आज (17 मार्च) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस वन-डे वर्ल्डकप भारतात होणार आहे, अशा परिस्थितीत दोन्ही संघ 50-50 च्या मालिकेत आपली पूर्ण ताकद पणाला लावताना दिसतील. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता वन-डे मालिकाही जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरेल. (IND vs AUS ODI)

मात्र, टीम इंडियासाठी कांगारूंचे वन-डेतील आव्हान सोपे असणार नाही. कारण ऑस्ट्रेलियाचे भारतातील रेकॉर्ड खूप चांगले आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियासमोर प्रत्येक आघाडीवर टिकून राहावे लागणार आहे. कारण कांगारूंनी 2019 मध्ये टीम इंडियाला घरच्या मैदानावरच वन-डे मालिकेत पराभवाची धूळ चारली होती. (IND vs AUS ODI)

हार्दिक पंड्या पहिल्यांदाच वन-डेत भारताचा कॅप्टन

टीम इंडियाचा नितमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या वन-डेत खेळणार नाही. तो दुसर्‍या सामन्यातून संघात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे पहिल्या वन-डेसाठी हार्दिक पंड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. अशातच पंड्यासमोर मोठे आव्हान आहे, ज्यावर त्याला कोणत्याही किमतीत मात करायची आहे. भारतीय संघाने या वर्षात रोहितच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सहा वन-डे सामने खेळले ज्यात विजयाची नोंद केली आहे. हा विजयाचा धडाका पंड्याला पुढे चालूच ठेवावा लागेल.

वन-डे मालिकेत टीम इंडियापुढे खेळपट्टीची मोठी अडचण

कसोटी मालिकेत फिरकीसाठी अनुकूल खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. अशा स्थितीत भारतीय संघाला फायदा झाला, पण वन-डे मालिकेत तसेच घडेल असे सांगता येत नाही. कारण, वन-डेमध्ये सामना रोमांचक बनवण्यासाठी येथे फलंदाजांना अनुकूल खेळपट्टी तयार केली जाऊ शकते, जिथे फिरकीपटूंना टर्न मिळणार नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाशी कडवा मुकाबला करावा लागेल. वन-डे मालिकेपूर्वी स्टार फलंदाज श्रेयस अय्यरलाही दुखापत झाली असून तो या मालिकेतून बाहेर पडला आहे. अलीकडच्या काळात त्याने वन-डेमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे टीम इंडियाला मधल्या फळीतील अय्यरच्या जागी एक चांगला पर्याय निवडावा लागेल.

यापूर्वीच्या मालिकेत भारताचा पराभव

2018-19 च्या वन-डे मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-2 ने पराभव केला होता. मालिकेतील पहिले दोन सामने टीम इंडियाने जिंकले होते, पण पुढचे तीन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात टाकली. त्या मालिकेत उस्मान ख्वाजाने ऑस्ट्रेलियासाठी 2 शतके झळकावून पाच सामन्यांत 383 धावा फटकावल्या होत्या. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. भारतासाठी विराट कोहलीने पाच सामन्यांत 2 शतकांसह 310 धावा केल्या होत्या.

वन-डेमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची आकडेवारी

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये आतापर्यंत 143 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने यातील 53 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 80 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 10 सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 64 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 29 आणि ऑस्ट्रेलियाने 30 सामने जिंकले आहेत. यादरम्यान 5 सामन्यांचे निकाल लागलेले नाहीत.

मेहुण्याच्या लग्नासाठी रोहित सुट्टीवर

कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रोहित शर्माने आपण पहिल्या वन-डेमध्ये खेळणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे रोहित हा पहिल्या वन-डे सामन्यात खेळणार नाही. रोहितच्या मेव्हण्याचे लग्न आहे. रोहितची पत्नी रितिकाचा भाऊ कुणालचे लग्न आहे आणि त्यासाठी रोहितने सुट्टी घेतली आहे. त्यामुळे रोहित आता पहिल्या वन-डेत खेळताना दिसणार नाही. रोहित दुसर्‍या वन-डेसाठी संघात येणार आहे. त्यामुळे रोहित अन्य दोन वन-डे सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे, पण पहिल्या वन-डे सामन्यात रोहितच्या जागी संघात कोणाला स्थान मिळेल, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

हेही वाचा;

Back to top button