IND vs AUS ODI : मुंबईतील आजच्या वन-डे सामन्यावर पावसाचे सावट? | पुढारी

IND vs AUS ODI : मुंबईतील आजच्या वन-डे सामन्यावर पावसाचे सावट?

मुंबई; वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. कसोटी मालिकेत 2-1 अशा विजयानंतर टीम इंडिया वन-डेतही विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. (IND vs AUS ODI)

उभय संघांमध्ये खेळल्या जाणार्‍या या एकदिवसीय सामन्यापूर्वी मुंबईकरांसाठी थोडी चिंतेची बातमी असून शुक्रवारी मुंबई आणि इतर शहरांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे वन-डे सामन्यावर याचा काही परिणाम होणार का, यावर सर्वांचे लक्ष आहे, पण क्यूवेदर अ‍ॅपच्या अहवालानुसार, 17 मार्च रोजी मुंबईचे हवामान पूर्णपणे स्वच्छ असेल. दीर्घकाळात पावसाची शक्यता नाही. (IND vs AUS ODI)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल, त्यामुळे मैदानावरील खेळाडूंना उन्हाचा तडाखा बसू शकतो. दिवसाचे कमाल तापमान 31 अंश तर किमान तापमान 24 अंश राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय आकाश जवळपास निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

वानखेडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा

या पहिल्या वन-डेमध्ये दोन्ही संघांचे कर्णधार बदललेले आहेत. हार्दिक पंड्या मुंबईत होणार्‍या वन-डेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ संघाची धुरा सांभाळण्यास सज्ज झाला आहे.

वानखेडे स्टेडियम भलेही टीम इंडियाचे होम ग्राऊंड असेल, पण या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघ वर्चस्व गाजवताना दिसतो. या मैदानावर एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि कांगारू तीन वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये यजमान संघाने केवळ एकच सामना जिंकला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 साली भारताने वानखेडेवर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्याचवेळी, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाशी शेवटचा सामना झाला होता. त्या सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून पराभव केला होता. अशा परिस्थितीत जेव्हा टीम इंडिया हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल, तेव्हा यावेळेस हा रेकॉर्ड मोडीत काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

या वर्षी भारताचा सलग सहा वन-डे ‘विजय’

टीम इंडियाने या वर्षी आतापर्यंत श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या तीन-तीन सामन्यांच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्विप दिला आहे. पंड्याने याआधी भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद भूषवले आहे, पण टीम इंडियासाठी तो प्रथमच वन-डेमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचा सामना करणे त्यांच्यासाठी सोपे नसेल.

हेही वाचा;

Back to top button