WPL 2023 : दिल्लीचा दिलखूश विजय; रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ६० धावांनी हरवले | पुढारी

WPL 2023 : दिल्लीचा दिलखूश विजय; रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ६० धावांनी हरवले

मुंबई; वृत्तसंस्था : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघात झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 60 धावांनी मात करत आपला पहिला विजय नोंदवला. तारा नॉरिसने 5 विकेटस् घेत दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघापुढे 224 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ निर्धारित 20 षटकांत 8 बाद 163 धावा करू शकला. (WPL 2023)

तत्पूर्वी, आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरलेला नाही. भारताची धडाकेबाज फलंदाज शेफाली वर्मा आणि दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने तुफानी अर्धशतके झळकावत नवा इतिहास रचला. दीडशतकी भागीदारीच्या जोरावर विजयासाठी बेंगलोरसमोर 224 धावांचे आव्हान ठेवले. (WPL 2023)

सलामीवीर शेफाली वर्मा आणि मेग लॅनिंग यांनी शानदार फलंदाजी केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 91 चेंडूंत 162 धावांची ऐतिहासिक भागीदारी केली. त्यात ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगने 43 चेंडूंत 72 धावांचे योगदान दिले. यात मेगने 14 चौकार लगावले, तर शेफाली वर्माने 45 चेंडूंत 84 आक्रमक खेळी केली. शेफालीने तिच्या खेळीला 10 चौकार आणि 4 षटकारांचा साज चढवला.

163 धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा डाव मारिजन कॅप आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी सांभाळला. दोघींनी तिसर्‍या विकेटसाठी 31 चेंडूंत 60 धावांची नाबाद भागीदारी केली. मारिजन कॅप 17 चेंडूंत 39 आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 15 चेंडूंत 22 धावा केल्या. कॅपने तीन चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचवेळी जेमिमाहने तीन चौकार मारले. आरसीबीकडून हिदर नाईटने दोन्ही विकेटस् घेतल्या.

दिल्ली कॅपिटल्स : 20 षटकांत 223 धावा. (शेफाली वर्मा 84, मेग लॅनिंग 72, हिदर नाईट 2/40)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : 20 षटकांत 8 बाद 163 धावा. (स्मृती मानधना 35, हिदर नाईट 34, मेगन स्कट 30. तारा नॉरिस 5/29)

V

हेही वाचा;

Back to top button