डेव्हिड वॉर्नर – हैदराबाद दरी वाढली; संघासोबत प्रवास करण्यास मज्जाव? | पुढारी

डेव्हिड वॉर्नर - हैदराबाद दरी वाढली; संघासोबत प्रवास करण्यास मज्जाव?

दुबई : पुढारी ऑनलाईन

डेव्हिड वॉर्नर – हैदराबाद दरी अजूनच रुंदावत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेलल्या माहितीनुसार सनरायझर्स हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने वॉर्नरला संघाबरोबर प्रवास करण्यास मज्जाव केला आहे. डेव्हिड वॉर्नर हा आयपीएल इतिहासातील एक दिग्गज खेळाडू आहे. त्याने गेले सहा हंगाम हैदराबादकडून धावांचा पाऊस पाडला आहे.

मात्र यंदाच्या आयपीएल हंगामच्या पहिल्या सत्रातच त्याला संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आले होते. यंदाचा हंगाम सनरायझर्ससाठी फारसा चांगला गेलेला नाही. वॉर्नरला कर्णधारपदावरुन हटवून केन विल्यमसनला कर्णधार करण्यात आले. यंदाच्या हंगामातील दुसऱ्या सत्रात वॉर्नरला दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याने ० आणि २ धावा केल्या.

डेव्हिड वॉर्नर – हैदराबाद दरी : वॉर्नरला टीमसोबत प्रवास करण्यास मज्जाव

डेव्हिड वॉर्नर गेल्या दोन सामन्यात हैदराबादच्या डग आऊटमधून गायब आहे. त्यावेळी त्याला संघ व्यवस्थापनाने संघासोबत प्रवास करण्यास मज्जाव केल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन हा डेव्हिड वॉर्नरचा मोठा अपमान झाल्याचे दिसते. वॉर्नरने हैदराबादसाठी अनेक वर्षापासून चांगली कामगिरी केली होती.

एका क्रिकेट चाहत्याने प्रसिद्ध क्रीडा पत्रकार बोरया मुजूमदार यांच्या हवाल्याने ट्विट केले की, ‘चेन्नई विरुद्धच्या सामन्यापूर्वी डेव्हिड वॉर्नरला संघासोबत प्रवास करण्यापासून रोखण्यात आले आहे.’

हैदराबाद प्ले ऑफ पासून कोसो दूर ( डेव्हिड वॉर्नर – हैदराबाद दरी )

सनरायझर्स हैदराबादने काल ( दि. ३० ) झालेला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना गमावल्यानंतर हैदराबाद अधिकृतरित्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहे. हैदराबादला २० षटकात फक्त १३४ धावाच करता आल्या होत्या. सीएसकेने हे आव्हान ४ फलंदाजांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकात पार करत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, पुढच्या वर्षी आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद काही खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे. मात्र सध्याची डेव्हिड वॉर्नर – हैदराबाद दरी पाहता वॉर्नरला संघ रिटेन करेल याची शक्यता फारच कमी आहे.

हेही वाचले का?

Back to top button