Shubman Gill Record : गिलने मोडला 'विराट' विक्रम! ६ महिन्यांत तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक | पुढारी

Shubman Gill Record : गिलने मोडला 'विराट' विक्रम! ६ महिन्यांत तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shubman Gill Record : टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला. 23 वर्षीय सलामीवीर शुभमन गिल भारताच्या विजयाचा हिरो ठरला. एकदिवसीय सामन्यांमध्ये शेवटच्या चार सामन्यांमध्ये तीन शतके झळकावणाऱ्या गिलला पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्याने याची भरपाई केली. तिसऱ्या सामन्यात गिलने 126 धावांची दमदार खेळी केली. यासह गिल आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला. त्याने विराट कोहलीचा (122 धावा) विक्रम मोडीत काढला आहे.

गिल ठरला टी-20 मध्ये भारताचा सर्वात तरुण शतकवीर (Shubman Gill Record)

गिल आता टी-20 फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात तरुण शतकवीर ठरला आहे. त्याने सुरेश रैनाचा विक्रम मोडला आहे. गिलने 23 वर्ष 146 दिवस वय असताना ही लक्षवेधी कामगिरी केली आहे. तर त्यापूर्वी रैनाने 23 वर्ष 156 वय असताना टी-20 मध्ये शतक झळकावले होते. गिलचे शतक हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारतीय फलंदाजांचे 13वे शतक ठरले आहे. या यादीत रोहित शर्मा (4), सुर्यकुमार यादव (3), केएल राहुल (2), विराट कोहली (1), दीपक हुडा (1), शुबमन गिल (1) यांचा समावेश आहे.

सहा महिन्यांत तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक (Shubman Gill Record)

गेल्या सहा महिन्यांत शुबमन गिलने कसोटी, वन-डे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत यावरून गिलच्या जबरदस्त फॉर्मचा अंदाज लावता येतो. तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा गिल हा केवळ पाचवा भारतीय आणि जगातील 21वा फलंदाज ठरला आहे. गिलच्या आधी सुरेश रैना, केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी हा पराक्रम केला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा गिल हा जगातील दुसरा सर्वात तरुण फलंदाज आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद शहजादने वयाच्या 22 वर्षे 127 दिवसांत ही कामगिरी केली. गिलने 23 वर्ष 146 दिवसात हा पराक्रम केला नोंदवला. (Shubman Gill Record)

गिलची सहा महिन्यात सहा शतके… (Shubman Gill Record)

न्यूझीलंड विरुद्ध : 126 (63 चेंडू) : टी-20 : फेब्रुवारी 2023
न्यूझीलंड विरुद्ध : 112 (78) : वन-डे : जानेवारी 2023
न्यूझीलंड विरुद्ध : 208 (149) : वन-डे : जानेवारी 2023
श्रीलंका विरुद्ध : 116 (97) : वन-डे : जानेवारी 2023
बांग्लादेश विरुद्ध : 110 (152) : कसोटी : डिसेंबर 2022
झिम्बाम्बे विरुद्ध : 130 (97) : वन-डे : ऑगस्ट 2022

कमी धावांमध्ये ऑलआऊट होण्याचा किवींचा विक्रम

तिसऱ्या टी-20 मध्ये न्यूझीलंडचा संघ अवघ्या 66 धावांत ऑलआऊट झाला. भारतीय खेळपट्ट्यांवर आंतरराष्ट्रीय टी-20 मधील कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. न्यूझीलंडचा पराभव हा कोणत्याही कसोटी खेळणा-या संघाचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात मोठा पराभव आहे. कोणत्याही कसोटी संघाचा सर्वात मोठा विजय श्रीलंकेच्या नावावर आहे. 2007 मध्ये श्रीलंकेने केनियाचा 172 धावांनी पराभव केला होता. भारताने टी-20 मध्ये कसोटी संघाचा दुसरा सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे.

घरच्या मैदानावर श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका खेळल्यानंतर टीम इंडिया आता कसोटी सामना खेळणार आहे. 9 फेब्रुवारीपासून भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेत भारताला किमान 2 कसोटी सामने जिंकावे लागतील.

 

Back to top button