IND vs NZ 3rdT20 : भारताचा न्यूझीलंडवर मोठा विजय, १६८ धावांनी उडवला धुव्वा; मालिकाही घातली खिशात | पुढारी

IND vs NZ 3rdT20 : भारताचा न्यूझीलंडवर मोठा विजय, १६८ धावांनी उडवला धुव्वा; मालिकाही घातली खिशात

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध न्यूझीलंड टी २० मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने न्यूझीलंडवर तब्बल १६८ धावांनी विजय मिळवला. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर हा सामना खेळवण्यात आला. शुभमन गिलची आक्रमक शतकी खेळी आणि हार्दिक पंड्याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. (IND vs NZ 3rdT20)

शुभमन गिलचे आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर २३५ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताच्या २३५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ६६ धावाच करु शकला. भारताकडून हार्दिक पंड्याने ४ तर अर्शदीप सिंग आणि शिवम मावीने प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. हार्दिक पंड्याने ४ षटकांमध्ये १६ धावा देत ४ महत्वपूर्ण विकेट्स पटकावल्या.

भारताच्या न्यूझीलंडकडून डेरल मिचेल शिवाय कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने २५ चेंडूमध्ये ३५ धावा केल्या. कर्णधार मिचेल सँटनरने १ चौकार लगावत १३ चेंडूमध्ये १३ धावा केल्या. भारतीय गोलंदाजीने न्यूझीलंडच्या संघाला ६६ धावांमध्येच गुंडाळले. (IND vs NZ 3rdT20)

तत्पूर्वी, भारताकडून शुभमन गिलने ७ षटकार आणि ११ चौकार लगावत १२६ धावा केल्या. त्याने शेवटच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहत आक्रमक फलंदाजी केली. तर राहुल त्रिपाठीने २२ चेंडूमध्ये ४४, सूर्यकुमार यादवने १३ चेंडूमध्ये २४ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून पावरप्लेमध्ये शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठीने आक्रमक फलंदाजी केली. न्यूझीलंडकडून मिचेल ब्रेसवेल, ब्लेअर टिकनर , इश सोधी आणि डेरल मिचेलने प्रत्येकी १ विकेट पटकावली. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. लॉकी फर्गुसन न्यूझीलंडकडून सर्वांत महागडा गोलंदाज ठरला त्याने ४ षटकांमध्ये ५४ धावा दिल्या. बेन लिस्टरने ४ षटकांमध्ये ४२ धावा दिल्या. तर ब्लेअर टिकनरचीही भारतीय फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. त्याने ३ षटकांमध्ये ५० धावा दिल्या. (IND vs NZ 3rdT20)

इशान किशनच्या रूपाने भारताने पहिली विकेट गमावल्यानंतर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. मात्र, आक्रमक फलंदाजी करताना राहुल त्रिपाठीने ४४ धावा करत विकेट गमावली. सूर्यकुमार यादवनेही आक्रमकपणे फटकेबाजी केली. भारतीय संघ विकेट गमावत असताना शुभमन गिल शेवटच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. हार्दिक आणि शुभमनने चौथ्या विकेटसाठी १०३ धावांची भागिदारी रचली. (IND vs NZ 3rdT20)

हेही वाचंलत का?

Back to top button