Steve Smith : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचे BCCI वर आरोप, म्हणाला… | पुढारी

Steve Smith : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचे BCCI वर आरोप, म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौ-यावर येण्यापूर्वीच काही आजी-माजी खेळाडूंनी धक्कादायक विधाने करून वातावरण तापवले आहे. त्यात आता स्टीव्ह स्मिथचीही भर पडली आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सराव सामना खेळण्यापेक्षा एकट्याने सराव करणे चांगले आहे, असे मत व्यक्त करून यजमान देश सरावासाठी ग्रासच्या विकेट उपलब्ध करून देतो, तर प्रत्यक्ष सामन्यांवेळी फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या तयार केल्या जातात असा बीसीसीआयवर अप्रत्यक्षरित्या आरोप केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

आपल्या कारकिर्दीत चौथ्यांदा देशाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या स्मिथने सांगितले की, ऑस्ट्रेलियन संघाला सराव सामन्यापेक्षा निव्वळ सराव सत्राचा अधिक फायदा होईल. आम्ही आमच्या नेट सरावादरम्यान फिरकीपटूंना हवे तसे गोलंदाजी करण्याची संधी मिळणे चांगले आहे. आम्ही सहसा इंग्लंडमध्ये दोन सराव सामने खेळतो. यावेळी भारतात एकही सराव सामना खेळणार नाही. असे त्याने स्पष्ट केले. कांगारू संघाने सराव सामना खेळण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

स्मिथ पुढे म्हणाला, भारतातील कसोटी मालिका नक्कीच खूप मोठी मालिका आहे. मी दोन वेळा कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात गेलो आहे. पण कधीही जिंकलो नाही. भारतीय खेळपट्ट्यांवर खेळणे नेहमीच कठीण असते. आमच्यासमोर काही आव्हाने आहेत पण खेळाडू त्यासाठी तयार आहेत, असा विश्वासही त्याने बोलून दाखवला. स्मिथच्या संघाला 2017 मध्ये भारत दौऱ्यावर 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. टीम इंडियाला मायदेशात पराभूत करणे खूप कठीण आहे. ऑस्ट्रेलियाला 2004-05 पासून भारतात एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका

पहिली कसोटी : 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी : 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली (अरुण जेटली स्टेडियम)
तिसरी कसोटी : 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी : 9 ते 13 मार्च, अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)

Back to top button