Pitch Curator : हार्दिक पंड्याच्या तक्रारीनंतर लखनौच्या पिच क्युरेटरची हकालपट्टी, बीसीसीआयचा मोठा निर्णय | पुढारी

Pitch Curator : हार्दिक पंड्याच्या तक्रारीनंतर लखनौच्या पिच क्युरेटरची हकालपट्टी, बीसीसीआयचा मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या तक्ररीनंतर लखनौ येथील एकना स्टेडियमच्या पिच क्युरेटरला आपली नोकरी गमवावी लागली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना लखनऊमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने कसाबसा विजय मिळवला. खरं तर, या सामन्यात दोन्ही संघ 239 चेंडूत केवळ 200 धावा करू शकले. सामन्यादरम्यान, चेंडू खेळपट्टीवर इतका फिरत होता की फलंदाजांना चेंडू खेळण्यासाठी फलंदाजांना खूप अडचण येत होती. त्यामुळे सामन्यानंतर पंड्याने खेळपट्टीवर जोरदार टीका केली. याची दखल थेट बीसीसीआयने घेत पिच क्युरेटरची हकालपट्टी केल्याचे मंगळवारी जाहीर केले.

लखनौ येथे खेळला गेलेला सामना लो स्कोअरिंगचा ठरला. फलंदाजांना धावा काढणेही जवळपास अशक्य झाले होते. किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 99 धावा केल्या. भारताने 20 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 6 विकेट्स शिल्लक असताना लक्ष्य गाठले. भारताच्या फिरकीपटूंनी 13 तर किवींच्या फिरकीपटूंनी 17 षटके टाकली. दोन्ही देशांच्या फिरकीने धावफलक अक्षरश: गोठल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

पीटीआयच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (युपीसीए)ने एकना स्टेडियमच्या खेळपट्टीसाठी संजीव कुमार अग्रवाल यांची नवे पिच क्युरेटर म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल 2023 च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महिनाभरात ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. भारत विरुद्ध न्यूझीलंड दुस-या टी-20 सामन्यापूर्वी, एकना मैदानावरील सर्व खेळपट्ट्यांवर बरेच देशांतर्गत क्रिकेटचे सामने खेळले गेले. त्यातच खराब हवामानामुळे नवीन विकेट तयार करण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. पण पिच क्युरेटरने आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी एक किंवा दोन खेळपट्ट्या सोडणे आवश्यक होते, असे म्हटले आहे.

सामन्यानंतर पंड्या म्हणाला, अपेक्षेपेक्षा ही धक्कादायक खेळपट्टी होती. मात्र, आम्हाला खेळपट्टीची फारशी काही तक्रार नाही. कुठल्याही परिस्थितीसाठी सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, पण ही खेळपट्टी टी-20 क्रिकेटसाठी बनलेली नाही, हे मात्र नक्की. क्युरेटर्स किंवा आम्ही ज्या ठिकाणी खेळणार आहोत त्यांनी हे पाहावे की ते खेळपट्ट्या वेळेत तयार कराव्यात. याशिवाय मी इथल्या प्रत्येक गोष्टीत खूप आनंदी आहे.

मात्र, ही खेळपट्टी टीम इंडियाच्या व्यवस्थापनाच्या सांगण्यावरून तयार करण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, क्युरेटरने सामन्यासाठी आधीच दोन काळ्या मातीच्या खेळपट्ट्या तयार केल्या होत्या. अशातच सामन्याच्या तीन दिवस आधी संघ व्यवस्थापनाने शेवटच्या क्षणी क्युरेटरला नवीन खेळपट्टी तयार करण्यास सांगितले. ही खेळपट्टी लाल मातीची असावी असेही निर्देश देण्यात आले होते. मात्र, नवीन खेळपट्टी कमीवेळेत होणे शक्य नव्हते.

Back to top button