Sunil Gavaskar : सडपातळ मुले हवी असतील तर फॅशन शो मध्ये जा; सरफराज खानवरून सुनील गावस्कर यांनी निवड समितीला फटकारले | पुढारी

Sunil Gavaskar : सडपातळ मुले हवी असतील तर फॅशन शो मध्ये जा; सरफराज खानवरून सुनील गावस्कर यांनी निवड समितीला फटकारले

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरफराज खानने (Sarfaraz Khan)  रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करूनही बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी त्याचा विचार न केल्याने दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीला फटकारले आहे. “जर तुम्ही सडपातळ मुले शोधत असाल, तर कोणत्याही फॅशन शोमध्ये जा, तिथे कोणीतर शोधा आणि त्यांच्या हातात बॅट-बॉल द्या,” अशा शब्दांत गावस्कर यांनी समितीवर सडकून टीका केली आहे.

Ind vs Sl : ‘वनडे क्रिकेट मरत आहे का?’ मैदानावरुन युवराज सिंगने व्यक्त केली चिंता

सरफराज खानची (Sarfaraz Khan) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात निवड न झाल्याने क्रिकेट चाहत्यांबरोबरच माजी क्रिकेटपटूंमध्येही नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून सरफराजच्या समर्थनार्थ अनेकांनी वक्तव्ये केली आहेत. माजी भारतीय गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी सरफराजची टीम इंडियात निवड न झाल्याबद्दल तिखट प्रतिक्रिया दिली होती. आता दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही बीसीसीआय आणि चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीवर सडकून टीका केली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले की, क्रिकेटपटू प्रत्येक आकाराचे असतात. क्रिकेटरच्या आकारावर जाऊ नका, क्रिकेट असे चालत नाही. त्याने केलेल्या स्कोअर आणि विकेटकडे पाहा. अनफिट खेळाडू शतक करू शकत नाही. क्रिकेटमध्ये फिटनेस ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. यो-यो चाचणी हा एकमेव मापदंड असू शकत नाही. ती व्यक्ती क्रिकेटसाठीही तंदुरुस्त आहे याची खात्री करून घ्यावी लागेल. कोणतीही व्यक्ती क्रिकेटसाठी योग्य असेल, तर त्याच्या लठ्ठपणामुळे काही फरक पडत नाही, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.

रणजी ट्रॉफीच्या मागील 2 हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक धावा

25 वर्षीय सरफराज खानने गेल्या दोन हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. ५३ प्रथम श्रेणी डावांनंतर फलंदाजीच्या सरासरीच्या बाबतीत सरफराज खान सर डॉन ब्रॅडमन यांच्या मागे आहे. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सर्फराज खानने शतक झळकावत मुंबईच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा केला. त्याच्या 125 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईला पहिल्या डावात 293 धावा करता आल्या होत्या.

Back to top button