IND vs NZ ODI: टीम इंडियात ‘या’ खेळाडूंमध्ये टशन! न्यूझीलंडविरुद्ध कुणाला मिळणार संधी? | पुढारी

IND vs NZ ODI: टीम इंडियात ‘या’ खेळाडूंमध्ये टशन! न्यूझीलंडविरुद्ध कुणाला मिळणार संधी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs NZ ODI : श्रीलंकेवर विक्रमी विजय नोंदवल्यानंतर 18 जानेवारीपासून टीम इंडिया आपल्या वन-डे विश्वचषकाच्या तयारीचा नवा अध्याय सुरू करेल. आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारताला तीन सामन्यांची मालिका खेळायची आहे. रोहित शर्माच्या संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली तर ते अव्वल स्थानावर झेप घेतील. दरम्यान, किवींविरुद्धच्या या मालिकेत केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या अनुपस्थितीत रोहितला आपल्या संघात महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत.

ईशान किशन ओपनिंग आणि विकेटकीपिंग करेल का?

ऋषभ पंतचा कार अपघात, तर वैयक्तीक कारणांमुळे राहुलची अनुपस्थिती यामुळे ईशान किशन हा न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे आणि टी-20 साठी विकेटकीपर म्हणून प्रबळ दावेदार मानला जात आहे. बुधवारपासून सुरू होणा-या वन-डे मालिकेत इशान हा ओपनिंग आणि विकेटकीपिंग करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या महिन्यात 126 चेंडूत एकदिवसीय इतिहासातील सर्वात जलद द्विशतक झळकावल्यानंतरही इशानला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली नाही आणि तो बाहेर बसला. संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्माने इशानऐवजी शुभमन गिलला प्राधान्य दिले. गिलने सुद्धा आपल्यावरील कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने तीन डावात एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. मात्र, किवींविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला राहुलच्या जागी सूर्यकुमार यादवला खेळवायचे असेल, तर किशनला सलामीला पाठवावे लागेल आणि अशा स्थितीत गिलला इलेव्हनच्या बाहेर जावे लागेल.

वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळणार?

रवींद्र जडेजाचा फिटनेस आणि अक्षर पटेलचा ब्रेक यामुळे ऑफ-स्पिनर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही मालिकांमध्ये संधी मिळू शकते. अक्षरच्या जागी बंगालचा अष्टपैलू शाहबाज अहमदची निवड करण्यात आली आहे. परंतु टॉम लॅथम, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मायकेल ब्रेसवेल आणि मिशेल सँटनर यांचा समावेश असलेल्या न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध वॉशिंग्टनची ऑफ-स्पिन गोलंदाजी उपयुक्त ठरू शकते.

2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून दुखापतींमुळे वॉशिंग्टन सुंदर त्रस्त आहे. परिणामी त्याला किमान दोन विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. आयपीएल 2022 पासून, त्याने त्याच्या पॉवर हिटिंगवर काम केले आहे. त्याचे कल्पक फटके गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध पाहायला मिळाले होते. वॉशिंग्टनने रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूकडून खेळताना फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सुरुवात केली. स्वत: ला एक चांगला फिरकीपटू आणि फिनिशर बनवण्यासाठी तो काम करत आहे.

शार्दुल ठाकूरचे पुनरागमन

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर शार्दुल ठाकूर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी परतला आहे, तर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला वनडे संघातून वगळण्यात आले आहे. दीपक चहर जखमी आणि भुवनेश्वर कुमार निवड समितीच्या नजरेतून बाहेर असल्याने शार्दुलला आणखी एक संधी देण्यात आली आहे. तो चहरसारखा स्विंग गोलंदाज नसला तरी तो नव्या चेंडूने उपयुक्त मारा करू शकतो. तसेच तो बॅटनेही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने चेन्नईत न्यूझीलंड अ विरुद्ध आठव्या क्रमांकावर खेळताना 33 चेंडूत 51 धावा फटकावून महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

प्रसिद्ध कृष्णाची अनुपस्थिति, उमरानला फायदा

2022 च्या पहिल्या सहामाहीत, मधल्या षटकांमध्ये प्रसिद्ध कृष्णा भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज होता, परंतु दीर्घकालीन दुखापतीने त्याची कारकीर्द ठप्प झाली आहे. अशातच प्रसिद्धच्या अनुपस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन उमरान मलिकच्या वेगवान आणि उसळीकडे वळले आहे. उमरान आतापर्यंत खेळलेल्या सहा वनडे सामन्यांमध्ये रिकाम्या हाताने परतलेला नाही. गुवाहाटीच्या सपाट खेळपट्टीवर श्रीलंकेने 374 धावांचे लक्ष्य ठेवले असताना उमरानने पाथुम निसांका, चारिथ अस्लंका आणि दुनिथ वेलाल्गे यांना बाद करून सामन्याचे चित्र फिरवले. अशा कामगिरीमुळे उमरानला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाच्या प्लॅनमध्ये ठेवले जाईल अशी शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.

कुलदीप विरुद्ध चहल

किमान एका फिरकी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूसह भारत अगामी वन-डे विश्वचषकात खेळणार हे निश्चित आहे. अशा स्थितीत विश्वचषक वर्षातील दुसऱ्या फिरकीपटूसाठी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यात लढत आहे. जर चहल खांद्याच्या दुखापतीतून सावरला नसेल तर कुलदीप न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मैदानात उतरेल अशी आशा आहे.

मात्र, चहल तंदुरुस्त राहिल्यास संघ व्यवस्थापना दोन फिरकीपटूंमध्ये कठोर निर्णय घ्यावा लागेल. अलीकडील वन-डे सामन्यांमध्ये चहल महागडा गोलंदाज ठरला आहे. परंतु त्याचा अनुभव आणि संथ गतीची गोलंदाजी घरच्या मैदानावर कामी आली आहे. कुलदीपने त्याच्या ॲक़्शनमध्ये अतिरिक्त जोर आणि वेग आणून प्लेईंग इलेव्हनमधील दावाही मजबूत केला आहे. हा डावखुरा फिरकी गोलंदाज गेल्या तीन आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोनदा सामनावीर ठरला आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

Back to top button