IND vs SL : सूर्या, केएल राहुलसह अनेक क्रिकेटपटू ‘पद्मनाभस्वामी’च्या चरणी | पुढारी

IND vs SL : सूर्या, केएल राहुलसह अनेक क्रिकेटपटू ‘पद्मनाभस्वामी’च्या चरणी

तिरुवनंतपुरम; पुढारी ऑनलाईन : केरळमध्ये खेळल्या जाणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी (दि.13) त्रिवेंद्रमला पोहोचला. यावेळी टिम इंडियाच्या खेळाडूंनी श्री पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शन घेतले. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल मंदिरासमोर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. (IND vs SL)

भारतीय संघ केरळच्या राजधानीत पोहोचल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पारंपरिक कथकली नृत्य आणि पारंपरिक केरळ मुखवट्यांसह मल्याळम नर्तकांनी त्यांचे थाटात स्वागत केले. ग्रीनफिल्ड स्टेडियमवर होणारा हा सामना स्टेडियमवर खेळला जाणारा दुसरा एकदिवसीय सामना असेल. (IND vs SL)

पद्मनाभस्वामीचे दर्शन (IND vs SL)

टीम इंडियाला रविवारी, १५ जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल हे पद्मनाभस्वामी मंदिरात पोहोचले. या खेळाडूंनी येथे पोहोचून देवाचे आशीर्वाद घेतले आणि प्रार्थनाही केली. पूजेदरम्यान सर्व भारतीय खेळाडू पारंपारिक कपड्यांमध्ये दिसले. या ड्रेसमधील भारतीय खेळाडूंचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टीम इंडियाचा क्लीन स्वीप 

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४ गडी राखून पराभव करत एकदिवसीय मालिका जिंकली होती. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला होता. टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यामुळे भारतीय संघ या मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. दोन सामन्यांत उत्कृष्ट खेळ करणारा भारतीय संघ फलंदाजी क्रमवारीत कोणताही बदल करणार नाही. कर्णधार रोहित शर्मा रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात त्याच्या काही गोलंदाजी पर्यायांचा विचार करू शकतो.

गोलंदाजी क्रमवारीत बदल होऊ शकतात

गोलंदाजी क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे. भारत 14 दिवसांच्या कालावधीत 6 एकदिवसीय सामने खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्ध तीन आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन सामने भारत खेळणार आहे. जसप्रीत बुमराहची दुखापत आणि मोहम्मद शमीचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे.


अधिक वाचा :

Back to top button