IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर सलग दुसरा विजय; मालिका घातली खिशात | पुढारी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर सलग दुसरा विजय; मालिका घातली खिशात

कोलकाता; वृत्तसंस्था : फिरकीपटू कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांच्या भन्नाट गोलंदाजीनंतर के. एल. राहुलने केलेल्या दमदार आणि समयोचित अर्धशतकामुळे भारताने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर 4 विकेटस्नी विजय मिळवला. या विजयाने भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. भारताच्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा डाव फक्त 215 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर हे आव्हान 40 चेेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. धावांचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी थोडी कोलमडली होती; परंतु उपकर्णधार के. एल. राहुल याने एक बाजू लावून धरली आणि अर्धशतकी खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला. राहुल 64 धावा करताना 6 चौकार ठोकले. (IND vs SL)

विजयासाठी 216 धावांचा पाठलाग करणार्‍या भारतीय संघाने आपले दोन्ही सलामीवीर 41 धावात गमावले. रोहित शर्मा 17 तर शुभमन गिल 21 धावा करून बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर गेल्या सामन्यातील शतकवीर विराट कोहलीवर भारताची सर्व मदार होती. मात्र कुमाराने त्याचा अवघ्या 4 धावांवर त्रिफळा उडवत भारताला तिसरा आणि मोठा धक्का दिला. (IND vs SL)

भारताची अवस्था 3 बाद 62 अशी झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रजिथाने 28 धावांवर खेळणार्‍या अय्यरला बाद करत भारताच्या अडचणीत वाढ केली. अय्यर बाद झाल्यावर के.एल. राहुल आणि हार्दिक पंड्याने सावध फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत भारताला 150 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र, हार्दिक पंड्या 36 धावा करून बाद झाला.

हार्दिक बाद झाल्यानंतर के.एल. राहुलने आपले अर्धशतक पूर्ण करत अक्षर पटेलच्या साथीने विजयाकडे वाटचाल सुरू केली. राहुल दमदार खेळत होता; परंतु अक्षरने आक्रमक फलंदाजी सुरू केली. त्याने एक सणसणीत चौकार आणि षटकारही ठोकला, पण दोनशेच्या आत तोही बाद झाला. यानंतर मात्र कुलदीप यादव (10 ) याने राहुलला विजयापर्यंत साथ दिली. कुलदीपने लाहिरू कुमाराला विजयी चौकार ठोकला. भारताने हे आव्हान 43.2 षटकांत पूर्ण केले.

तत्पूर्वी, कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या लढतीत श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्यासाठी हा निर्णय फार चांगला ठरला नाही. सहाव्या षटकात मोहम्मद सिराजने सलामीवीर आविष्का फर्नांडोला 20 धावांवर बोल्ड केले. त्यानंतर कुसल मेंडिस आणि नुवानिडू फर्नांडो यांनी दुसर्‍या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. ही जोडी लंकेला मोठ्या धावसंख्येकडे नेईल असे वाटत असताना कुलदीप यादवच्या हाती चेंडू आला. त्याने कुसलला 34 धावांवर माघारी पाठवले. तर पुढच्याच म्हणजे 18 व्या षटकात अक्षर पटेलने धनंजया डी सिल्वाला शून्यावर बाद करून लंकेची अवस्था 1 बाद 101 वरून 3 बाद 103 अशी केली.

सलग दोन धक्क्यातून श्रीलंका डाव सावरेल असे वाटत होते, मात्र तसे झाले नाही. सलामीवीर नुवानिडू फर्नांडो 50 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर कर्णधार दासून शनाका 2 धावांवर तर चारिथ असलंका 15 धावांवर कुलदीपने माघारी पाठवले. कुलदीपनंतर उमरान मलिकने वानिंदू हसरंगाला 21 धावांवर बाद केले. या सामन्यात श्रीलंका दोनशे धावाही करणार नाही, असे वाटत होते, पण श्रीलंकेच्या तळाच्या फलंदाजांनी यावेळी दमदार फलंदाजी केली आणि संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला, पण मोहम्मद सिराजने यावेळी एकामागून एक दोन विकेटस् घेतले आणि त्यामुळे भारताला श्रीलंकेचा डाव 215 धावांवर आटोपता आला. कुलदीपने 51 धावांत 3, सिराजने 30 धावांत 3 तर मलिकने 48 धावांत 2 विकेटस् घेतल्या.

मोहम्मद सिराज पॉवर प्लेचा मास्टर बॉलर!

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कोलकाताच्याईडन गार्डन्स मैदानावर आपल्या करिअरमधील नवे शिखर पादाक्रांत केले आहे. विशेष बाब म्हणजे त्याच्या जवळपास जगातील एकही गोलंदाज नाही. गुरुवारच्या सामन्यात सिराजने पॉवर प्लेमध्ये श्रीलंकेची पहिली विकेट घेत त्यांना बॅकफूटवर ढकलले. यासह तो पॉवर प्लेचा मास्टर बॉलर ठरला आहे. श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा सिराजने अविष्काचा (20) अडसर दूर करत संघाला पहिले यश मिळवून दिले. याचबरोबर 2022 पासून ते आतापर्यंत सिराज वन-डे सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये 19 विकेटस् घेण्यात यशस्वी
ठरला आहे. या यादीत दुसर्‍या क्रमांकावर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आहे, ज्याच्या नावावर पॉवर प्लेमध्ये दहा विकेटस् आहेत. सिराज दुसर्‍या गोलंदाजाच्या किती पुढे आहे, हे या आकडेवारीवरून समजू शकते.

कुलदीपचा नेत्रदीपक पराक्रम

रोहित शर्माने टीम इंडियामध्ये एक महत्त्वाचा बदल केला. कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. दुखापतग्रस्त असलेल्या युजवेंद्र चहलला संघाबाहेर बसवण्यात आले आहे. कुलदीपला संघात स्थान मिळाल्यानंतर लगेचच त्याने एका मोठ्या पराक्रमाला गवसणी घातली.

टीम इंडियात नियमित स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला फिरकीपटू कुलदीप यादव जेव्हाही संधी मिळेल तेव्हा त्याचा फायदा उठवण्यात कसूर करत नाही. सध्या त्याने संघात स्थान मिळवले आणि महत्त्वाची विकेट घेत खास पराक्रम केला. त्याने विकेटस्चे द्विशतक पूर्ण केले.

कुलदीपने आजच्या या कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 200 बळी पूर्ण केले. कुलदीपने 107 सामन्यांत आणि 110 डावांमध्ये हा पराक्रम केला आणि हा टप्पा गाठणारा तो भारताचा 23 वा गोलंदाज ठरला. कुलदीपने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 122 विकेटस् घेतल्या आहेत. कुलदीपला 122 विकेटस् घेण्यासाठी 72 डाव खेळावे लागले. यामध्ये दोन हॅट्ट्रिकचा देखील समावेश आहे.

त्याचबरोबर कुलदीपला जेव्हा-जेव्हा कसोटी आणि टी-20 मध्ये संधी मिळाली, तेव्हा त्याने विकेटस् घेतल्या आहेत. कुलदीपच्या नावावर कसोटीतील 14 डावांत 34 आणि टी-20 च्या 24 डावांत 44 बळी आहेत. कुलदीपने 25 मार्च 2017 रोजी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच वर्षी, पुढील काही महिन्यांत, त्याने वन-डे आणि टी-20 मध्ये पदार्पण केले होते. त्याला 200 बळींचा टप्पा गाठण्यासाठी 5 वर्षांच्या कालावधी लागला.

हेही वाचा;

Back to top button