Prithviraj Chavan : लोकसंख्येत भारत २०२३ पर्यंत चीनलाही मागे टाकेल; पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

Prithviraj Chavan : लोकसंख्येत भारत २०२३ पर्यंत चीनलाही मागे टाकेल; पृथ्वीराज चव्हाण

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : युनो संघटनेच्या अहवालानुसार आज आपली लोकसंख्या १४२ कोटींपर्यंत गेली आहे. येत्या १४ एप्रिल २०२३ पर्यंत भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून जगातला एक नंबरचा देश बनेल. लोकसंख्या वाढत चालली असली तरी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपले दरडोई उत्पन्न घटत चालल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला. औरंगाबादेतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

चव्हाण यावेळी बोलत असताना म्हणाले की, लोकसंख्येच्या आकाराला महत्व नाही, तर तुमचे दरडोई उत्पन्न किती आहे, याला महत्व आहे. ते तुमच्या समृद्धीचे लक्षण आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळत आहे, मात्र केंद्र शासन आकडे फुगवून दाखवित आहेत. महागाई, बेरोजगारी वाढत आहे, तर दरडोई उत्पन्न घटत आहे. आपले दरडोई उत्पन्न हे २४७० डॉलर आहे, तर चीनचे १२९०० डॉलर आहे. तसेच जर्मनी ५० हजार आणि अमेरिकेचे ७६ हजार डॉलर आहे. बांग्लादेशही दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताच्या पुढे असून, त्यांचे उत्पन्न २७३० डॉलर असल्याची माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली. आज आपला जीडीपीचा दर ६-७ टक्के असून, या गतीने आपल्याला चीनला गाठायला २० वर्षे लागतील. तोपर्यंत चीन आणखी पुढे गेलेला असेल, असेही ते यावेळी म्हणाले.

मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेलवर २८ लाख कोटी रुपये कर रुपाने गोळा करण्यात आले. याशिवाय सरकारी, निमसरकारी व सार्वजनिक उपक्रमांची विक्री केली गेली. खासगीकरणाच्या माध्यमातून ठराविक उद्योगपतींना ते विकण्यात आले. नुसते रस्ते, दळणवळणाची इतर साधने उपलब्ध करून देताना उच्च शिक्षण, आरोग्य यासह इतर मुलभुत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा

Back to top button