ख्रिस्तियानो रोनाल्डो याची राजेशाही बडदास्त | पुढारी

ख्रिस्तियानो रोनाल्डो याची राजेशाही बडदास्त

रियाध, वृत्तसंस्था : जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने अलीकडेच सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबशी करार केला. त्यामुळे तो आता युरोप सोडून आशियातून खेळतो आहे. या कराराच्या बदल्यात त्याला देशातील कठोर कायद्यांतून सूटही देण्यात आली. त्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डो आता ‘लिव्ह इन’मध्ये त्याची मैत्रिण जॉर्जिनासोबत सौदीमध्ये आरामात राहू शकतो. या स्टार फुटबॉलपटूसह त्याच्या कुटुंब आणि कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था रियाधच्या किंगडम टॉवरमधील फोर सीझन्स हॉटेलमधील लक्झरी सूटमध्ये करण्यात आली आहे. या सर्वांसाठी 17 खोल्या बुक करण्यात आल्या असून हा सर्व लवाजमा येथे महिनाभर वास्तव्यास असणार आहे.

फोर सीझन्स हे सौदीतील सर्वात आलिशान हॉटेल असून लक्झरी सूटचे एका दिवसाचे भाडे सुमारे 8.50 लाख रुपये आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जेव्हा रोनाल्डो एका महिन्यानंतर या हॉटेलमधून चेक आऊट करेल तेव्हा त्याचे भाडे सुमारे 2.5 कोटी रुपये होईल. हा सूट ऑनलाईन किंवा ऑफलाईन बुक केला जाऊ शकत नाही. हे हॉटेल फक्त जगभरातील निवडक सेलिब्रिटींसाठी बुक केले जाते. या हॉटेलच्या खोल्याचे भाडे नेमके किती आहे, याची माहिती देखील सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही.

ख्रिस्तियानो रोनाल्डो राहत असलेले फोर सीझन्स हॉटेल ज्या किंगडम टॉवरमध्ये आहे त्याचे दोन मजले खास रोनाल्डो आणि त्याचे कुटुंबीय, कर्मचारी यांच्यासाठी बुक केले गेले आहेत. त्यामध्ये 17 खोल्यांचा समावेश आहे. यात क्लब, जिम, गरम पाण्याचा स्विमिंग पूल, टेनिस कोर्टसह ध्यानधारणेसाठीही खास जागा उपलब्ध आहेत. या खोल्या 48 आणि 50 व्या मजल्यावर आहेत. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला येथे प्रवेश करण्यास मनाई आहे.

रोनाल्डोसाठी भारतीय, चायनीज, जापनीज आणि मध्यपूर्वेतील काही स्वाद्दिष्ट पदार्थांची व्यवस्था केली जाणार आहे. फोर सीझन्स हॉटेल हे किंगडम टॉवरमधील अनेक आलिशान मजल्यांमध्ये बांधले आहे. या इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यावर जगातील सर्वात महागड्या ब्रँड लुईस व्हिटेन इत्यादींचे शोरूम आहेत. रोनाल्डो, त्याचा स्टाफ, 5 मुले आणि गर्लफ्रेंड जॉर्जिया रॉड्रिग्ज यांना कसलीही अडचण येऊ नये यासाठी हॉटेल कर्मचार्‍यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. हॉटेलचे कर्मचारी रोनाल्डोसोबत फोटो तर दूरच ऑटोग्राफही मागू शकत नाहीत.

Back to top button