Kohli React on Suriya’s Century : सूर्याच्या झंझावाती फलंदाजीपुढे विराट कोहली नतमस्तक! दिली ‘ही’ प्रतिक्रिया | पुढारी

Kohli React on Suriya's Century : सूर्याच्या झंझावाती फलंदाजीपुढे विराट कोहली नतमस्तक! दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kohli React on Suriya’s Century : विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवची मैदानावरची मैत्री सगळ्यांनी पाहिली आहे, पण किंग कोहली मैदानाबाहेरही या खेळाडूला खूप सपोर्ट करतो. जेव्हा कोहली टी-20 संघाचा भाग नसतो आणि त्या दरम्यान सूर्या उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करतो तेव्हा भारताचा हा माजी कर्णधार टीम इंडियाच्या 360 डिग्री फलंदाजाचे कौतुक करण्यास मागे हटत नाही. शनिवारी (दि. 7) श्रीलंकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात सूर्याने टी-20 कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले तेव्हाही कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली. कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सूर्याच्या फोटोसह दोन फायर इमोजी आणि दोन टाळ्यांचे इमोजीही पोस्ट केले.

सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात 51 चेंडूत 112 धावांची नाबाद खेळी केली. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन शतके झळकावणारा तो जगातील पहिला नॉन-ओपनर खेळाडू ठरला आहे. या सामन्यात 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर सूर्याने शतकासाठी केवळ 19 चेंडू घेतले. त्याने 45 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि भारतासाठी टी-20 मधील दुसरे सर्वात जलद शतक ठोकले. सुर्याने यापूर्वी इंग्लंड (117) आणि न्यूझीलंडमध्ये (नाबाद 111) शतके झळकावली आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सूर्याच्या अप्रतिम खेळीमुळेच भारताने श्रीलंकेविरुद्ध 228 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या आव्हानासमोर पाहुण्या संघाचा डाव 137 धावांत गारद झाला आणि भारताने हा सामना 91 धावांनी जिंकला. धडाकेबाज खेळीसाठी सूर्याला सामनावीराचा, तर अक्षर पटेलला मालिकेतील अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारताला 10 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या एकदिवसीय मालिकेसह, भारत आगामी विश्वचषक 2023 च्या तयारीला सुरुवात करेल. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांसारखे वरिष्ठ खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेद्वारे पुनरागमन करणार आहेत.

सूर्याचा मॅक्सवेल आणि मुनरोच्या क्लबमध्ये समावेश

टी-20 क्रिकेटमधील तिसरे शतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोची बरोबरी केली आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. झेक प्रजासत्ताकच्या द्विजीनेही आपल्या देशासाठी टी-20 मध्ये तीन शतके झळकावली आहेत, पण तो सहयोगी संघाकडून खेळतो.

Back to top button