

पुढारी ऑनलाईन डेस्क : asia cup 2023 India vs Pakistan : क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा चुरशीची लढत होणार आहे. ज्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव आणि एसीसी प्रमुख जय शहा यांनी आज (दि. 5) केली. पण त्याहून मोठी बातमी म्हणजे भारतीय संघ १७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. आशिया कप 2023 चे वेळापत्रक जय शहा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध केले असून यजमान देशाच्या बदलाबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.
आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी 2023 आणि 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. या यादीत चाहत्यांची पहिली नजर पाकिस्तानात होणा-या आशिया कप 2023 वर पडली. शहा यांच्या ट्विटनुसार, सप्टेंबरमध्ये आशिया कप एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाईल, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात असतील. तर दुस-या गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ आहेत. मात्र आशिया चषक पाकिस्तानात होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वास्तविक, पाकिस्तान अधिकृतपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे, परंतु BCCI सचिव असल्याने, जय शहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे की टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही. (Asia Cup 2023)
जय शहा यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, '2023 आणि 2024 साठी एसीसी पाथवे स्ट्रक्चर आणि क्रिकेट कॅलेंडर सादर करत आहे! या खेळाला नवीन उंचीवर नेण्यासाठी आमचे अतुलनीय प्रयत्न आणि तळमळ दिसून येते. विविध देशांतील क्रिकेटपटू नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याने, क्रिकेटसाठी हा उत्तम काळ असेल!'
आशिया चषक 2023 मध्ये साखळी ते अंतिम सामना असे एकूण 13 सामने खेळवले जातील. मात्र या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. शहा यांच्या ट्विटनुसार, सप्टेंबरमध्ये होणार्या एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत जवळपास 6 संघ असतील. ते दोन गटात विभागलेले आहेत. भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर-1 एकाच गटात आहेत. दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत. साखळी फेरीत एकूण 6 सामने खेळवले जातील. त्यानंतर प्रत्येक गटातील दोन संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. पुढेची फेरी राऊंड रॉबिन स्वरूपात म्हणजेच सुपर-4 पद्धतीने असेल. यादरम्यान 4 संघांमध्ये एकूण 6 सामने होतील. त्यानंतर अंतिम सामाना होईल. या स्पर्धेत एकूण 13 सामने होणार आहेत. (Asia Cup 2023)
टी 20 विश्वचषक 2022 च्या आधी, जय शहा यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) स्पष्ट केले होते की भारतीय संघ 2023 मध्ये होणा-या एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी हलवली जाईल. बीसीसीआय सचिवांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तान बहुराष्ट्रीय स्पर्धेत प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणार असून स्पर्धेपूर्वीचे हे विधान यजमानांसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. जय शहा यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानकडून टीका करण्यात आली होती. तसेच त्यांच्या बोर्डाचे माजी चेअरमन रमीज राजा यांनी भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये आला नाही तर आमचा संघ 2023 च्या विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही, असा इशारा दिला होता. (Asia Cup 2023)
एसीसीने घोषित केलेल्या दोन वर्षांच्या (2023-2024) एकूण 145 एकदिवसीय आणि टी 20 सामने खेळले जातील. 2023 मध्ये 75 आणि 2024 मध्ये 70 सामने होतील. याशिवाय 23 वर्षांखालील आशिया कपचे देखील आयोजन करण्यात येणार आहे, जी या वर्षी जुलैमध्ये आठ संघांत (पुरुष) होईल. ही स्पर्धा 50 षटकांच्या स्वरूपात खेळवली जाईल. मात्र, पुढील वर्षी डिसेंबरमध्ये ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये होईल. दुसरीकडे, या वर्षी जूनमध्ये होणारी महिलांची 23 वर्षांखालील आशिया कप स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल, ज्यामध्ये आठ संघांचा सहभाग असेल.
आशिया कप 2022 युएई मध्ये टी 20 स्वरुपात खेळला गेला. अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून श्रीलंका चॅम्पियन बनला. टीम इंडिया ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकून सुपर-4 मध्ये पोहोचली होती, पण पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभूत झाल्याने ते बाहेर पडले. त्या स्पर्धेत विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून तीन वर्षांचा दुष्काळ संपवला होता.