Adam Milne : न्यूझीलंडला झटका, ॲडम मिल्नेची भारत-पाकिस्तान दौऱ्यातून माघार | पुढारी

Adam Milne : न्यूझीलंडला झटका, ॲडम मिल्नेची भारत-पाकिस्तान दौऱ्यातून माघार

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ॲडम मिल्ने (Adam Milne) याने पुरेशा तयारीअभावी भारत आणि पाकिस्तान दौ-यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी ब्लेअर टिकनरचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. तो सध्या न्यूझीलंड संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर आहे. वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचे काही खेळाडू 4 जानेवारीला पाकिस्तानला रवाना होतील. तर 18 जानेवारीपासून भारताविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

हॅमस्ट्रिंगची दुखापत होऊनही मिल्ने (Adam Milne) मायदेशातील भारताविरुद्धच्या मालिकेत खेळला होता. मात्र उखापत बळावल्याने डिसेंबरमध्ये झालेल्या फोर्ड ट्रॉफीच्या दोन सामन्यांत तो खेळू शकला नाही. त्यानंतर तो वेलिंग्टन फायरबर्ड्ससाठी सुपर स्मॅशच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळला, परंतु पाकिस्तान आणि भारताच्या 16 दिवसांच्या दौऱ्यात सहा एकदिवसीय सामने खेळणे खूप धोकादायक असल्याचे मानत त्याने किवी बोर्डाच्या संमतीने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याच्या जागी ब्लेअर टिकनरला संघात संधी मिळाली आहे.

न्यूझीलंडचे निवडकर्ते गेविन लार्सन म्हणाले की, हा निर्णय घेणे सोपे नव्हते. अ‍ॅडम मिल्नेने तो अनफिटासल्याची आम्हाला स्पष्टपणे जाणीव करून दिली. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर, आम्ही मान्य केले की सलग तीन सामन्यांच्या दोन वन डे मालिका खेळण्यास त्याची पुरेशी तयारी नाही. आम्ही त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतो.’

30 वर्षीय किवी वेगवान गोलंदाज मिल्नेने (Adam Milne) आतापर्यंत न्यूझीलंडकडून 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये 45 बळी घेतले आहेत, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 35 सामन्यांमध्ये 36 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताचा न्यूझीलंड दौरा 2023

• पहिली वन डे : 18 जानेवारी (हैदराबाद)
• दुसरी वनडे : 21 जानेवारी (रायपूर)
• तिसरी वनडे : 24 जानेवारी (इंदौर)
• पहिला टी-20 सामना : 27 जानेवारी (रांची)
• दुसरा टी-20 सामना : 29 जानेवारी (लखनौ)
• तिसरा टी-20 सामना : 1 फेब्रुवारी (अहमदाबाद)

Back to top button