पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि पाकिस्तान यांच्यात तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा कसोटी सामना खेळला जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही संघात अखेरचा कसोटी सामना हा २००७ मध्ये झाला होता. आता ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानावर उभय संघांमध्ये कसोटी सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे. यासाठी मेलबर्न क्रिकेट क्लब 'आयसीसी'शी चर्चा करणार आहे. ( IND vs PAK Test )
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी मेलबर्न क्रिकेट क्लबचे ( एमसीसी ) मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी सांगितले की, "आम्ही मेलबर्न मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामना होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीशी (आयसीसी) चर्चा करणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये कसोटी सामना होणे ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच ठरेल."
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेबाबत निर्णय पूर्णपणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( पीसीबी) यांच्यावरच अवलंबून आहे. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलिया कोणत्याही सामन्यांच्या आयोजनासाठी तयार आहे, असेही फॉक्स यांनी स्पष्ट केले आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये मेलबर्न मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सामना झाला होता. या सामन्यात भारताने रोमहर्षक विजयाची नोंद केली होती. या सामन्यावेळी मेलबर्न मैदानावर विक्रमी ९०,२९३ प्रेक्षकांची उपस्थिती होती. या सामन्यानंतर मेलबर्न क्रिकेट क्लबकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यात मेलबर्न मैदानावर कसोटी सामन्याच्या आयोजनासाठी अनौपचारिक चर्चा सुरु करण्यात आली आहे, असेही फॉक्स यांनी नमूद केले.
भारत आणि पाकिस्तानमधील टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सामना हा अभूतपूर्व होता. या सामन्यातील प्रत्येक चेंडूवर प्रेक्षकांनी क्रिकेटचा थरार अनुभवला. असाच थरार कसोटी सामन्यातही अनुभवता येईल, असा विश्वासही फॉक्स यांनी व्यक्त केला आहे.
२०२३ ते २०२७ या कालावधीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका होणार नाही. आता पुढील वर्षी म्हणजे २०२३ ला पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धा होणार आहे. तर वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यात आले आहे. मात्र पाकिस्तानमध्ये होणार्या स्पर्धेबाबत 'बीसीसीआय'ने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा :