IND vs SL : भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; अविष्का फर्नांडोचे पुनरागमन | पुढारी

IND vs SL : भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; अविष्का फर्नांडोचे पुनरागमन

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेने आपला टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. बुधवारी (दि. २८ डिसेंबर) जाहीर झालेल्या संघात अविष्का फर्नांडोने पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर वानिंदू हसरंगाला टी-२० आणि कुशल मेंडिसला वनडे संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. दोन्ही संघांची कमान दासून शनाकाच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. (IND vs SL)

अविष्का फर्नांडोने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळला होता. त्यावेळी त्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो दुखापतींमुळे बाहेर होता. लंका प्रीमियर लीगमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली होती. या वर्षात त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. फर्नांडोने श्रीलंका प्रीमियर लीगच्या १० सामन्यात ३७.६७ च्या सरासरीने ३३९ धावा केल्या होत्या. अंतिम फेरीतील सामन्यात तो सामनावीर ठरला होता. (IND vs SL)

या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सदीरा समरविक्रमाचीही संघात निवड झाली आहे. श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये त्याला मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आले होते. समरविक्रमाने २०१७ मध्ये श्रीलंकेसाठी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने चार कसोटी, सात एकदिवसीय आणि नऊ टी-२० सामने खेळले आहेत. त्याची अनुभवी दिनेश चंडिमलच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.

अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या नुवानिडू फर्नांडोला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. तर नुवान तुषाराची टी-२० संघात निवड झाली आहे. श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा (१४) नुवान दुसरा होता.

हेही वाचा;

Back to top button