ICC Ranking : आर. अश्विन, श्रेयस अय्यरची आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये झेप! | पुढारी

ICC Ranking : आर. अश्विन, श्रेयस अय्यरची आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये झेप!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी आयसीसी क्रमवारीत झेप घेतली आहे. अश्विन आता जगातील टॉप पाच गोलंदाजांच्या यादीत धडक मारली आहे, तर अय्यर सर्वोत्कृष्ट 20 फलंदाजांमध्ये पोहचला आहे.

मीरपूर कसोटीत सहा विकेट आणि दुसऱ्या डावात नाबाद 42 धावा करणा-या अश्विनने आता गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहसह संयुक्तरित्या चौथे स्थान मिळवले असून फलंदाजांच्या क्रमवारीत तो 84 व्या स्थानावर पोहोचला. तर श्रेयस अय्यरने दहा स्थानांचा फायदा मिळवत फलंदाजांच्या क्रमवारीत थेट 16 व्या क्रमांकावर उडी मारली आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये अश्विनने (343 गुण) दुसरे स्थान कायम ठेवले आहे. रवींद्र जडेजा 369 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ​​बांगला देश विरुद्धच्या मालिकेत प्लेअर ऑफ द सिरीज ठरूनही चेतेश्वर पुजाराचे नुकसान झाले आहे. तीन स्थानांचा तोटा सहन करत तो आता 19 व्या क्रमांकावर पोहचला आहे. तर विराट कोहली दोन स्थानांनी घसरून 14व्या स्थानावर गेला आहे.

केएल राहुलला 8 स्थानांचे नुकसान

बांगलादेशविरुद्धच्या दुस-या कसोटीच्या पहिल्या डावात 93 धावा करणारा ऋषभ पंत फलंदाजांच्या क्रमवारीत 6 व्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, या संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरलेल्या केएल राहुलला मोठे नुकसान झाले आहे. त्याला 8 स्थानांचा तोटा झाला आहे. राहुल आता 55व्या स्थानावर घसरला आहे.

सध्या ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन कसोटी क्रमवारीत अव्वल ठरला असून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी कायम आहे. बांगलादेशचा फलंदाज लिटन दास कारकिर्दीतील सर्वोत्तम 12व्या रँकिंगवर पोहोचला आहे, तर मोमिनुल हक 68व्या, झाकीर हसन 70 व्या आणि नुरुल हसन 93 व्या क्रमांकावर आहे. फिरकीपटू तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी दोन स्थानांचा फायदा झाला असून ते 28 व्या आणि 29 व्या स्थानावर आहेत.

Back to top button