

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) 'आयसीसी इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या शर्यतीत त्याला द. आफ्रिकेचा मार्को जॅनसेन, न्यूझालेंडचा फिन ॲलन आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान यांचे आव्हान असेल. या पुरस्कारांसाठी जानेवारी महिन्यात मतदान सुरू होईल, असे आयसीसीने जाहीर केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीतच अर्शदीपला (Arshdeep Singh) या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18.12 च्या सरासरीने 33 बळी पटकावले आहेत. अर्शदीपचा इकॉनॉमी रेट 8.17 असून त्याची सर्वोत्तम कामगिरी 37 धावांत 4 विकेट अशी आहे. तो नवीन आणि जुन्या अशा दोन्ही चेंडूंवर विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील प्रभावी कामगिरीनंतर अर्शदीपने टीम इंडियाच्या टी-20 संघात स्थान मिळवले. तसेच नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याने वन डे क्रिकेटमध्येही पदार्पण केले.
अर्शदीपने (Arshdeep Singh) टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भेदक मारा केला. त्याने मेलबर्न क्रिकेट मैदानात स्विंगच्या जोरावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर डेथ ओव्हर्समध्ये त्याने असिफ अलीलाही बाद केले. त्या सामन्यात अर्शदीपने 32 धावांत तीन बळी घेतले होते. अर्शदीपच्या या लक्षवेधी कामगिरीची दखल आयसीसीने घेत त्याला 'आयसीसी इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नामांकन दिले असून भारतीय क्रिकेटसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
आयसीसीने 2004 साली 'इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर' या पुरस्काराची सुरुवात केली. त्यावेळी भारताच्या इरफान पठाणने या पुरस्कारावर मोहोर उमटवली होती. त्यानंतर चेतेश्वर पुजाराने 2013 तर ऋषभ पंतने 2018 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. मात्र, त्यानंतर या पुरस्कारासाठी एकाही भारतीयाची निवड झाली नाही आणि आता तब्बल पाच वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर अर्शदीपला नामांकन मिळाले आहे.