Shane Warne : शेन वॉर्नचा सन्मान! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला ‘या’ पुरस्काराच्या नावात बदल | पुढारी

Shane Warne : शेन वॉर्नचा सन्मान! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला ‘या’ पुरस्काराच्या नावात बदल

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shane Warne : दिवंगत क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या सन्मानार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला. संघटनेने त्यांचा दुसरा सर्वात प्रतिष्ठित पुरस्काराच्या नावात बदल केल्याची घोषणा केली. यापुढे ‘टेस्ट प्लेयर ऑफ द ईयर’ (पुरुष) हा पुरस्कार शेन वॉर्न ‘टेस्ट प्लेयर ऑफ द ईयर’ या नावाने ओळखला जाईल असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी जाहीर केले. अॅलन बॉर्डर मेडल हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांची घोषणा 30 जानेवारीला होणार आहे.

शेन वॉर्नने (Shane Warne) यावर्षी 4 मार्च रोजी जगाचा निरोप घेतला. थायलंडला सुट्टी एन्जॉय करताना फिरकीच्या या जादूगाराचे निधन झाले. शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून 145 कसोटी सामने खेळले. त्यात त्याने विक्रमी 708 विकेट घेतल्या. त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 71 धावांत 8 बळी. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 194 एकदिवसीय सामनेही खेळले ज्यात त्याने 293 विकेट घेतल्या. 33 धावांत 5 बळी ही त्याची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय वॉर्नने कसोटीत 3154 धावा आणि वनडेमध्ये 1018 धावा केल्या आहेत.

शेन वॉर्नने (Shane Warne) आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाचा हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला होता. 2005 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्धच्या ॲशेस मालिकेत विक्रमी 40 बळी घेतले होते. हे वर्ष वॉर्नच्या सर्वोत्तम वर्षांपैकी एक होते. ट्रॅव्हिस हेड हा पुरस्कार जिंकणारा शेवटचा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे, तर उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन आणि नॅथन लियॉन हे पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये या पुरस्काराचे प्रमुख दावेदार आहेत.

लाबुशेन हा सध्या ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. गेल्या उन्हाळ्यात त्याने 8 कसोटी सामन्यांमध्ये 69.75 च्या उत्कृष्ट सरासरीने 837 धावा केल्या. लबुशेनच्या मागे उस्मान ख्वाजा आहे, त्याने या कालावधीत 68.66 च्या सरासरीने 824 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, गोलंदाजांबद्दल चर्चा करायची झाल्यास नॅथन लियॉनने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 39 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्सने अनुक्रमे 27 आणि 24 बळी मिळवले आहेत.

Back to top button