SAvsAUS Boxing Test : 17.50 कोटींच्या ‘या’ बॉलरसमोर द. आफ्रिकेचे लोटांगण! ऑस्ट्रेलियाचे पहिल्या दिवशी वर्चस्व | पुढारी

SAvsAUS Boxing Test : 17.50 कोटींच्या ‘या’ बॉलरसमोर द. आफ्रिकेचे लोटांगण! ऑस्ट्रेलियाचे पहिल्या दिवशी वर्चस्व

पुढारी ऑनलाईन डेस्क : SAvsAUS Boxing Test : बॉक्सिंग-डे कसोटीच्या पहिल्याच दिवशी द. आफ्रिकन फलंदाजांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर लोटांगण घातले. त्यामुळे त्यांचा पहिल्या डाव 189 धावांतच आटोपला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या या कसोटीत कांगारूंचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन चमकला. त्याने 10.4 षटकात 27 धावांत द. आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवून आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. तर मिचेल स्टार्कने दोन, स्कॉट बोलँड आणि नॅथन लियॉनने प्रत्येकी एक बळी घेतला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात 1 गडी बाद 45 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. त्यानंतर मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या हिरव्यागार खेळपट्टीवर पहिला फलंदाजीस उतरलेल्या द. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. 29 धावांवर सरेल इर्व्ही (18)च्या रुपात पहिला धक्का बसला. स्कॉट बोलँडच्या चेंडूवर उस्मान ख्वाजाने त्याचा झेल घेतला. थेयुनिस डी ब्रुइन केवळ 12 धावा करून कॅमेरून ग्रीनचा बळी ठरला. त्यानंतर 58 च्या एकूण धावसंख्येवर कर्णधार डीन एल्गर (26) धावबाद झाला. यानंतर टेंबा बावुमा (1) आणि खाया जोंडो (5) झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर काइल वेरेनी आणि मार्को जेन्सेन यांनी आफ्रिकेचा डाव सांभाळला आणि सहाव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. पण, 179 धावसंख्या असताना ग्रीनने ही जोडी फोडली. व्हेरेनी 52 धावा बाद झाला. यानंतर काही वेळातच जेन्सनही 59 धावा करून ग्रीनचा बळी ठरला. जेन्सन बाद झाल्यानंतर केशव महाराज (2), कागिसो रबाडा (4) बाद झाले. शेवटी लुंगी एनगिडीला (2) क्लीन बोल्ड करून ग्रीनने पाहुण्यांचा डाव 189 धावांत संपुष्टात आणला. (SAvsAUS Boxing Test)

प्रत्युत्तरार कांगारूच्या संघाने 12 षटकात 1 गडी बाद 45 धावा केल्या. उस्मान ख्वाजाला कागिसो रबाडाने 1 धावेवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आपला 100 वा कसोटी सामना खेळणारा डेव्हिड वॉर्नर 32 धावा करून क्रीजवर आहे आणि मार्नस लॅबुशेन 5 धावांवर खेळत आहे.

मुंबई इंडियन्सची कॅमेरून ग्रीनवर सर्वाधिक बोली

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने यंदा पहिल्यांदाच आयपीएल खेळण्यात रस दाखवला आणि त्याने लिलावासाठी आपले नाव नोंदवले. नुकत्याच झालेल्या लिलावात त्याच्यावर अक्षरश: पैशांचा पाऊस पडला. 2 कोटी रुपयांची मूळ किंमत असलेल्या ग्रीनला विकत घेण्यासाठी 3 फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत झाली, परंतु आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने बाजी मारली आणि ग्रीनला आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट करून घेतले. एमआयने या खेळाडूला 17.50 कोटी रुपयांना खरेदी केले. (SAvsAUS Boxing Test)

Back to top button