Shahid Afridi : शाहिद आफ्रिदीचे पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुनरागमन, मिळाली मोठी जबाबदारी | पुढारी

Shahid Afridi : शाहिद आफ्रिदीचे पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुनरागमन, मिळाली मोठी जबाबदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. आफ्रिदी यावेळी निवड समितीमध्ये काम करताना दिसणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शनिवारी (दि.२४) त्याची राष्ट्रीय निवड समितीच्या अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती केली. शाहिद आफ्रिदी शिवाय अब्दुल रझ्झाक, राव इफ्तिखार अंजुम आणि हारून राशिद यांचा सुद्धा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. (Shahid Afridi)

पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही दिवसांपूर्वी मोठे बदल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी रमीज राजा यांना ‘पीसीबी’च्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले होते. तर पीसीबीच्या अध्यक्षपदी नजम सेठी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता निवड समितीमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. (Shahid Afridi)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले की, “शाहिद आफ्रिदी आक्रमक खेळाडू होते. त्यांच्याकडे दोन दशकांचा अनुभव आहे. शाहिद आफ्रिदी पाकिस्तानच्या संघाला पुढे घेऊन जाण्याचे काम करतील. पुढील काळात संघासमोर असणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला तयार करतील.” (Shahid Afridi)

शाहिद आफ्रिदीची निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्याने ‘पीसीबी’चे आभार मानले आहेत. आफ्रिदी म्हणाला, “माझ्यावर निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली त्यासाठी मी ‘पीसीबी’चा आभारी आहे. आम्ही पुन्हा एकदा संघात बदल करून विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील कामगीरी करु.” (Shahid Afridi)

दरम्यान, पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानचा संघ आता न्यूझीलंडविरूद्ध कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे.

शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तानच्या सर्वोकृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. त्याने पाकिस्तानकडून ३९८ एकदिवसीय सामन्यांत ८०६४ धावा केल्या आहेत. तर ९९ टी २० सामन्यात १४१६ धावा त्याच्या नावावर आहेत. (Shahid Afridi)

हेही वाचलतं का?

Back to top button