मीरपूर; वृत्तसंस्था : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी आणि अंतिम कसोटी ढाका येथे खेळली जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यांचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला. भारत-बांगलादेश सामना तिसऱ्या दिवस अखेर रोमांचक स्थितीत आहे. भारताला विजयसाठी १०० धावा करणे गरजेचे आहे. तर बांगलादेशला भारताचा पराभव करण्यासाठी ६ विकेट्स काढाव्या लागणार आहेत.
मेहंदी हसनने विराट कोहलीला बाद केले आहे. विराट कोहलीला २२ चेंडूमध्ये केवळ १ धाव करता आली आहे.
दरम्यान, बांगलादेशने भारताला सलग दोन धक्के दिले आहेत. कर्णधार के.एल.राहुल आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतले आहेत. शाकिब अल हसनने के.एल. राहुलला बाद केले. तो ७ चेंडूमध्ये २ धावा करत माघारी परतला. तर चेतेश्वर पुजाराला मेहंदी हसनने बाद केले आहे. चेतेश्वर पुजारा १२ चेंडूमध्ये ६ धावा करत बाद झाला आहे.
भारताने ऋषभ पंत (93) आणि श्रेयस अय्यर (87) यांच्या 159 धावांच्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर पहिल्या डावात 87 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. दुसर्या दिवशी टीम इंडियाने 314 धावा केल्या होत्या. तर बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला. अक्षर पटेलने 3, अश्विन, सिराजने प्रत्येकी 2, उमेश आणि उनाडकटने प्रत्येकी १ विकेट घेतली. बांगला देशकडून दुसऱ्या डावात लिटन दासने सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. तर झाकिर हसनने देखील अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पहिला धक्का शाकिब अल हसनने दिला. त्याने तिसऱ्या षटकात के एल राहुलला आउट केले. नारूल हसनने त्याचा झेल टिपला.
बांगला देशचे सलामीवीर नजमूल हुसेन शांतो आणि झाकीर हसन दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. पण आठव्या षटकांत बांगला देशला पहिला धक्का बसला. अश्विनने शांतोला पायचीत केले. तो 5 धावांवर आउट झाला. बांगलादेशची दुसरी विकेट 26 धावांवर पडली. मोहम्मद सिराजने मोमिनुल हकला यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. मोमिनूलने नऊ चेंडूत पाच धावा केल्या. त्यानंतर बांगला देशची धावसंख्या 13 षटकांत 2 बाद 26 अशी होती. शाकिब अल हसन ३६ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. त्याला जयदेव उनाडकट याने शुभमन गिल करवी झेलबाद केले. त्यानंतर 31 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूला बांगला देशला चौथा झटका बसला. मुशफिकूर रहीम याला अक्षर पटेलने पायचीत केले. त्याने 19 चेंडूत 9 धावा केल्या. तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत बांगला देशची धावसंख्या 4 बाद 71 अशी होती.
42 षटकांत बांगला देशने 100 धावांचा टप्पा पूर्ण केला. यामध्ये झाकीर हसनने अर्धशतक झळकावले. 102 धावानंतर बांगला देशचा निम्मा संघ तंबूत परतला. उमेश यादवने बांगला देशला पाचवा धक्का दिला. झाकीर हसन अर्धशतकी खेळी करून बाद झाला. त्याने 135 चेंडूत 51 धावा केल्या. 45 षटकाच्या 5 व्या चेंडूवर अक्षर पटेलने मेहदी हसन मिराझला पायचीत केले. 50 षटकानंतर बांगला देशची धावसंख्या 6 गडी गमावत 146 धावा अशी होती. 159 धावांवर बांगला देशची सातवी विकेट पडली. अक्षर पटेलने नुरुल हसनला बाद केले. त्याने 29 चेंडूत 31 धावा केल्या.
बांगलादेशने 219 धावांवर आठवी विकेट गमावली. मोहम्मद सिराजने लिटन दासला बाद करून भारताला आठवे यश मिळवून दिले. त्याने लिटन दास आणि तस्किन अहमद यांची भागीदारी मोडली. लिटन दासने 98 चेंडूत 73 धावा केल्या. त्यानंतर तैजुल इस्लामला रविचंद्रन अश्विनने पायचीत केले. अक्षर पटेलने खालेद अहमदला बाद केले. त्यामुळे बांगला देशचा डाव 231 धावांत आटोपला.
भारत आणि बांगला देश कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना मीरपूर येथे खेळला जात आहे. दुसर्या दिवशी टीम इंडियाने 314 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 87 धावांची आघाडी घेतली. या सामन्यात बांगला देशने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या होत्या. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसर्या डावात बांगला देशने एकही विकेट न गमावता सात धावा केल्या होत्या. पण तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीलाच बांगला देशला पहिला धक्का बसला.
भारताने दुसर्या दिवशी आपला पहिला डाव बिनबाद 19 धावांपासून पुढे सुरू केला होता. मात्र, बांगला देशचा फिरकीपटू तैजुल इस्लामने आधी के. एल. राहुलला 10 धावांवर, त्यानंतर शुभमन गिलला 20 धावांवर पायचित बाद करत भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी पहिला सेशन खेळून काढण्याच्या इराद्याने भागादारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी भारताला 73 धावांवर पोहोचवले असतानाच तैजुलने ही जोडी फोडली. त्याने पुजाराला 24 धावांवर बाद केले; तर विराट कोहलीला तस्किनने 24 धावांवर बाद करत माघारी धाडले.
यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. मात्र दोन्ही खेळाडूंचे शतक हुकले. पंतने 105 चेंडूंत 93, तर अय्यरने 105 चेंडूंत 87 धावा केल्या. या दोघांनी भारताची धावसंख्या 94/4 वरून 253/5 पर्यंत नेली. मात्र, पंत बाद होताच भारताचा डाव गडगडला. भारताने शेवटच्या सहा विकेटस् 62 धावांत गमावल्या. बांगला देशकडून शाकिब अल हसन आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी चार विकेटस् घेतल्या. तस्किन अहमद आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.