IPL Auction : ग्रीन, स्टोक्स, पुरन, ब्रूकवर पैशांचा पाऊस! | पुढारी

IPL Auction : ग्रीन, स्टोक्स, पुरन, ब्रूकवर पैशांचा पाऊस!

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL Auction : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मिनी लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोची येथे सुरू झाला. लिलावात इंग्लंडच्या सॅम कुरनने सर्व विक्रम मोडीत काढले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. 2 कोटींची मूळ किंमत असलेल्या सॅम कुरनला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. यापूर्वी केएल राहुल (17 कोटी रुपये) हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होता. लखनौ सुपरजायंट्सने गेल्या वर्षी त्याचा संघात समावेश केला होता.

सॅम कुरननंतर कॅमेरून ग्रीनचा क्रमांक लागला. त्याला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपयांना विकत घेतले. ग्रीनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. तो प्रथमच आयपीएलमध्ये खेळणार आहे. किरॉन पोलार्डच्या जागी मुंबईने त्याचा संघात समावेश केला. दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस (16.25 कोटी रुपये) सर्वात तिसरा महागडा खेळाडू ठरला.

ग्रीननंतर बेन स्टोक्सवर पैशांचा पाऊस पडला. त्याला चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले. स्टोक्स याआधी महेंद्रसिंग धोनीसोबत लखनौ सुपरजायंट्समध्ये खेळला आहे. स्टोक्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई यांच्यात त्याच्यासाठी जोरदार बोली लागली. शेवटी चेन्नईने बाजी मारली.

वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन, ज्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, त्याला लखनौ सुपरजायंट्सने 16 कोटी रुपयांना विकत घेतले. पूरन गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादसोबत होता. त्या स्पर्धेत त्याची काही खास कामगिरी झाली नव्हती. अनेक सामन्यांत तो शून्यावर बाद झाला होता, पण तरीही यंदाच्या लिलावात त्याला भरघोस किंमत किंमत मिळाली आहे.

सनरायझर्स हैदराबादने इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकवर पैशांचा वर्षाव करून सर्वांनाच चकित केले. त्याने हॅरी ब्रूकला 13.25 कोटी रुपयांना खरेदी केले. ब्रूकची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. हॅरी ब्रूकने इंग्लंडसाठी 26 जानेवारी 2022 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला. त्याने आतापर्यंत 20 सामन्यांच्या 17 डावात 372 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 81 आहे. ब्रूकची सरासरी 26.57 आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट 137.78 आहे. सनरायझर्स एवढ्यावरच थांबला नाही. त्यांनी भारताच्या मयंक अग्रवालसाठीही मोठी बोली लावली. मयंकची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. सनरायझर्सने त्याला आठपट जास्त पैसे देऊन आपल्या संघात समाविष्ट केले. सनरायझर्सने मयंकला 8.25 कोटी रुपयांना खरेदी केले. तो संघाचा पुढचा कर्णधार होऊ शकतो.

न्यूझीलंडचा दिग्गज आणि सनरायझर्स हैदराबादचा माजी खेळाडू केन विल्यमसनची लिलावात पहिली विक्री झाली. त्याला गुजरात टायटन्सने केवळ 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. गुजरातशिवाय अन्य कोणत्याही संघाने विल्यमसनसाठी बोली लावली नाही. त्याचवेळी अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपर किंग्जने 50 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

Back to top button