Hockey World Cup : हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, हरमनप्रीत सिंगकडे संघाची धुरा | पुढारी

Hockey World Cup : हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, हरमनप्रीत सिंगकडे संघाची धुरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : १३ जानेवारीपासून ओडिशा येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषक (Hockey World Cup) स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. संघात १८ सदस्यीय संघाचे कर्णधारपद बचावपटू हरमनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे. १३ जानेवारीपासून हॉकी विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. भुवनेश्वर आणि राउरकेला येथे सामने होणार आहेत. अंतिम सामना २९ जानेवारीला होणार आहे.

बचावपटू अमित रोहिदासला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तर, हरमनप्रीतने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघाची धुरा सांभाळली होती. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा ४-१ असा पराभव झाला. टोकिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत हरमनप्रीत सिंगने संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदकाची कमाई केली होती.

बेंगळुरू येथे झालेल्या दोन दिवसांच्या सराव सत्रानंतर विश्वचषक संघाची निवड करण्यात आली. यावेळी ३३ खेळाडूंनी सराव सत्रात  घेण्यात आले होती. आश्चर्यकारक म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळलेले गुरजंत सिंग आणि दिलप्रीत सिंग यांना मुख्य संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यांना संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.

विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना १३ जानेवारीला स्पेनविरूध्द होणार आहे. तर याच मैदानावर टीम इंडियाचा दुसरा सामना १५ तारखेला इंग्लंडशी होणार आहे. यानंतर १९ तारखेला भुवनेश्वरमध्ये वेल्सविरुद्ध तिसरा सामना होणार आहे. २२ जानेवारीपासून बाद फेरीच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. २२ आणि २३ जानेवारीला क्रॉसओव्हर सामने खेळवले जातील. उपांत्यपूर्व फेरी २५ जानेवारीला तर उपांत्य फेरी २७ जानेवारीला होणार आहे. २९ जानेवारीला अंतिम आणि कांस्यपदकाचा सामना होणार आहे.

हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघ

गोलरक्षक : कृष्ण बहादूर पाठक आणि पी.आर. श्रीजेश
बचावपटू : जरमनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप
मिडफिल्डर : मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकंता शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग
फॉरवर्ड : मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक आणि सुखजित सिंग
राखीव खेळाडू: राजकुमार पाल आणि जुगराज सिंग

हेही वाचा;

Back to top button