Sensex, Nifty down | ब्लॅक फ्रायडे! सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, 'या' ५ घटकांमुळे शेअर बाजाराचा मूड बिघडला | पुढारी

Sensex, Nifty down | ब्लॅक फ्रायडे! सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, 'या' ५ घटकांमुळे शेअर बाजाराचा मूड बिघडला

Sensex, Nifty down : आर्थिक मंदीचे सावट, मध्यवर्ती बँकांचे वाढते व्याजदर आणि कोरोनाची धास्ती आदी कारणांमुळे शेअर बाजारात शुक्रवारी (दि.२३) मोठी घसरण झाली. आजच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल आज १ हजार अंकांनी घसरला. त्यानंतर ९८० अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स ५९,८४५ वर येऊन बंद झाला. तर निफ्टी ३२० अंकांनी घसरून १७,८०० वर बंद झाला. सेन्सेक्सची आजची घसरण ही १.६१ टक्क्यांची आहे. तर निफ्टी १.७७ टक्क्यांने खाली आला. अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील आणि टाटा मोटर्स यांचे निफ्टीवर सर्वाधिक नुकसान झाले. बीएसई मिडकॅप इंडेक्स ३.३ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप इंडेक्स जवळपास ४ टक्क्यांनी घसरला. जगभरातील बहुतांश अर्थव्यवस्थांमध्ये वाढता महागाई दर कायम आहे. यामुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका २०२३ मध्येही कठोर आर्थिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. याचा परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहे. फार्मा शेअर्स वगळता देशातील सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी आज लाल रंगात व्यवहार केला.

बँक आणि आयटी शेअर्समुळे मूड खराब

सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली. आजच्या व्यवहारात बँक आणि आयटी शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टीवर बँक आणि आयटी इंडेक्स सुमारे १ टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर ऑटो, मेटल आणि रियल्टी इंडेक्सदेखील १ टक्क्यांनी कमकुवत झाला. आजच्या टॉप लुजर्समध्ये टाटा मोटर्स, टाटा स्टील, विप्रो, इन्फोसिस, मारुती, एसबीआय, टेक महिंद्रा यांचा समावेश होता. तर सन फार्मा, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक हे टॉप गेनर्स राहिले.

गुंतवणूकदारांना ३.५ लाख कोटींचा फटका

दरम्यान, आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे ३.५ लाख कोटींचा फटका बसला आहे. गुरुवारी ज्यावेळी बाजार बंद झाला त्यावेळी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) २,८०,५५,५३५.२२ कोटी रुपये एवढे होते. तर आज शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ते २,७६,९०,६८९.४८ कोटी रुपयांवर आले होते. सेन्सेक्सने गेल्या ४ दिवसांत सुमारे १,६०० अंक गमावले आहेत. तर या महिन्यात २,९०० (४.६ टक्के) अंकांची घसरण पहायला मिळाली आहे. (Sensex, Nifty down)

कमकुवत जागतिक संकेत

कमकुवत जागतिक संकेतामुळे आज भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री पहायला मिळाली. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढ कायम ठेवणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. त्यात काही देशांत कोरोनाची भिती निर्माण झाली आहे. यामुळे अमेरिकेसह आशियाई बाजारात घसरण झाली. याचे पडसाद शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातही उमटले.

कोरोनाची धास्ती वाढली

कोरोनाची आणखी एक लाट येणार असल्याची भिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर फार्मा आणि हेल्थकेअर वगळता सर्वच क्षेत्रांमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. चीनमधील कोरोनाची वाढती प्रकरणे आणि मृत्यूच्या वाढत्या आकड्यांमुळे चिनी अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे. भारतात ओमाक्रॉन व्हेरियंटची नवी काही आढळून आलेली प्रकरणे, संशयित नवीन कोविड व्हेरियंट आणि सरकारने जारी केलेल्या सूचनांमुळेही गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे.

जपानमधील महागाई ४० वर्षांतील उच्चांकावर

जपानमधील ग्राहक महागाई दराने नोव्हेंबरमध्ये ४० वर्षांतील उच्चांक गाठला आहे. तो ३.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. किमतीतील वाढीची व्याप्ती आता मोठ्या क्षेत्रांमध्ये पसरत असल्याचे हे लक्षण आहे.

आशियाई बाजारातही घसरण

अमेरिकेतील डाऊ जोन्स निर्देशांक १.१ टक्क्यांनी घसरला आहे. तर नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक २.२ टक्क्यांनी घसरला. दरम्यान, आशियाई बाजारांवर नजर टाकली तर शुक्रवारी टोकियोचे शेअर्स खाली आले. निक्केई निर्देशांक १.११ टक्के म्हणजेच २९३ अंकांनी घसरला. तर Topix निर्देशांक ०.७५ टक्क्यांनी घसरून १,८९३ वर आला. (Stock Market Today)

हे ही वाचा :

Back to top button