पुढारी ऑनलाईन डेस्क : KL Rahul Injured : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का बसला आहे. सरावादरम्यान, संघाचा कर्णधार केएल राहुलच्या हाताला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुरुवारपासून (22 डिसेंबर) सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तो खेळू शकला नाही, तर उपकर्णधार चेतेश्वर पुजारा संघाची धुरा सांभाळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी राहुलच्या दुखापतीबाबत अपडेट दिली. ते म्हणाले की, 'सरावावेळी केएल राहुलच्या हाताला दुखापत झाली आहे, पण ती फारशी गंभीर नाही. डॉक्टर त्याच्या दुखापतीकडे लक्ष ठेवून आहेत. दुस-या कसोटीत त्याच्या खेळण्याबाबतचा अंतिम निर्णय सामन्यापूर्वी घेतला जाईल. जर तो मैदानात उतरू शकला नाही तर पुजारा कर्णधार असेल आणि अभिमन्यू ईश्वरनला पदार्पणाची संधी मिळेल.' (KL Rahul suffers hand injury ahead of 2nd Bangladesh Test)
चट्टोग्राम कसोटी 188 धावांनी जिंकून टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या गुणतालिकेत दुस-या स्थानी आहे. हे स्थान कायम ठेवून स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी संघाला बांगला देश विरुद्धची दुसरी कसोटी जिंकणे गरजेचे आहे.
राहुलचा कसोटीतील फॉर्म अलीकडच्या काळात खराब आहे. गेल्या पाच डावांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. राहुलने आपले शेवटचे अर्धशतक जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे झळकावले होते. त्यानंतर त्याला पाच डावांत अनुक्रमे 8, 12, 10, 22 आणि 23 धावाच करता आल्या. राहुलने 44 सामन्यात 35.02 च्या सरासरीने 2592 धावा केल्या आहेत. (KL Rahul suffers hand injury ahead of 2nd Bangladesh Test)