

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India in FIFA WC : फिफा विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची एन्ट्री होईल की नाही यावरून फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी मोठे विधान केले आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी 'मन की बात' केली असून वर्ल्ड कप 2026 मध्ये 32 ऐवजी 48 संघ मैदानात उतरतील. अशा स्थितीत भारतीय संघ पात्र ठरण्याची मोठी संधी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इन्स्टा लाईव्ह दरम्यान, त्यांना भारताच्या पुढील विश्वचषकात खेळण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता यावेळी त्यांनी उत्तर देताना आपली भूमिका मांडली.
इन्फँटिनो पुढे म्हणाले, मी भारतीय चाहत्यांना आश्वस्त करतो की भारतीय फुटबॉलला नवी उंची गाठून देण्यासाठी आम्ही तेथे मोठी गुंतवणूक करत आहोत. एवढ्या मोठ्या देशात फुटबॉलची जोरदार स्पर्धा व्हायला हवी. तसेच, भारताचा सर्वोत्तम फुटबॉल संघ असावा. यावर आम्ही सातत्याने काम करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. (Team India in FIFA WC gianni infantino)
भारतीय फुटबॉल संघ एकदाही विश्वचषक स्पर्धेचा भाग बनू शकलेला नाही. पुढील फिफा विश्वचषक 2026 मध्ये होणार आहे. ज्याचे आयोजन युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांनी संयुक्तपणे केले जाणार आहे. पुढील विश्वचषक स्पर्धेत 48 संघ सहभागी होणार आहेत. अशा स्थितीत भारताला त्यात खेळण्याची संधी मिळेल. गेल्या काही काळापासून भारतीय फुटबॉल संघाच्या कामगिरीत चढ-उतार होत आहेत. अशा स्थितीत विश्वचषकात पात्र ठरण्यासाठी या संघाला अधिक चांगला खेळ दाखवावा लागेल, असेही मत इन्फँटिनो यांनी व्यक्त केले. (Team India in FIFA WC gianni infantino)
कतारमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनानंतर फिफा अध्यक्षांनी फुटबॉल हा जागतिक खेळ बनण्याबाबत महत्त्वाचे विधान केले होते. या स्पर्धेची पातळी खूप उंचावली आहे. इतिहासात प्रथमच सर्व खंडातील संघ फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचले. अशा परिस्थितीत फुटबॉल हा खेळ खऱ्या अर्थाने जागतिक होत असल्याचे आपण पाहत आहोत, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली.