France vs Argentina final : एम्‍बाप्पेला पराभवाचे दु:ख अन् फ्रान्‍स राष्‍ट्राध्‍यक्षांची ‘जादुची झप्‍पी’… फुटबॉल प्रेमीने अनुभवले अनोखे ‘सांत्‍वन’ | पुढारी

France vs Argentina final : एम्‍बाप्पेला पराभवाचे दु:ख अन् फ्रान्‍स राष्‍ट्राध्‍यक्षांची 'जादुची झप्‍पी'... फुटबॉल प्रेमीने अनुभवले अनोखे 'सांत्‍वन'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यात रविवारी ( दि. १८) फ्रान्‍स आणि अर्जेंटिना आमने-सामने आले. जगभरातील कोट्यवधी फुटबॉल चाहत्‍यांनी एका अविस्‍मरणीय सामन्‍याचा थरार अनुभवला.अखेर अर्जेंटिना संघाने सामना जिंकत विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं. अंतिम सामन्‍यातील पराभव फ्रान्‍सच्‍या खेळाडूंबरोबरच चाहत्‍यांच्‍याही जिव्‍हारी लागला. फ्रान्‍सचा मेगास्‍टार खेळाडू किलियान एम्‍बाप्पे हा तर काही मिनिटे निराशेच्‍या गर्तेतच गेल्‍याचे सर्वांनी पाहिलं. याचवेळी एम्‍बाप्पे याची समजूत काढण्‍यासाठी फ्रान्‍सचे राष्‍ट्राध्‍यक्ष इमॅन्‍युएल मॅक्रॉन थेट मैदानात उतरले. संपूर्ण जगाने फुटबॉल खेळाची जादू अनुभवतानाच पराभवानंतर गळाभेट घेत खेळाडूचे सांत्‍वन करणारा राष्‍ट्राध्‍यक्षही अनुभवला. ( France vs Argentina final )

एकीकडे आनंदाश्रू तर दुसरीकडे पराभवाची खंत …

फुटबॉल विश्‍वचषकाचा अंतिम सामना कतारची राजधानी दोहामधील लुसैल स्टेडियमवर रंगला. विजयानंतर अर्जेंटिनाचे खेळाडू आनंदाश्रूत न्हाहून निघाले. तब्‍बल ३६ वर्षांची प्रतीक्षा संपल्‍याचा खेळाडूंच्‍या चेहर्‍यावरील आनंद शब्‍दातीत ठरला. तर दुसरीकडे फ्रान्‍सच्‍या खेळाडू अंतिम क्षणी झालेल्‍या पराभवाने कमालीचे व्‍यथित झाले. फ्रान्‍सचा मेगास्‍टार खेळाडू एम्‍बाप्‍पेच्‍या चेहर्‍यावरील पराभवाची वेदना सर्वांनाच भावुक करणारी ठरली. त्‍याने अश्रूला वाट करुन देत आपले दु:ख व्‍यक्‍त केली. याचवेळी अंतिम सामना पाहण्‍यासाठी आलेले फ्रान्‍सचे राष्‍ट्राध्‍यक्ष इमॅन्‍युएल मॅक्रॉन मैदानात उतरले.

France vs Argentina final : मॅक्रॉन यांची ‘जादूची झप्‍पी’

पराभवामुळे उदास झालेल्‍या किलियन एम्‍बाप्पे याला सावरण्‍यासाठी मॅक्रॉन यांनी त्‍याच्‍याकडे धाव घेतली. गळाभेट घेत
एम्‍बाप्‍पे याला पराभावाच्‍या दु:खातून सावरण्‍याचा त्‍यांनी प्रयत्‍न केला. एक राष्‍ट्राध्‍यक्षाने एका खेळाडूचे केलेले ‘सांत्‍वन’ हे
लुसैल स्‍टेडियमसह संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरले आहे. या घटनेचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल होत असून, राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या क्रीडा प्रेमाचे कौतुक होत आहे. सामन्‍यानंतर मॅक्रॉन यांनी ड्रेसिंग रुममध्‍ये जावून सर्व खेळाडूंबरोबर सुमारे २० मिनिटे चर्चा केली. खेळाडूंच्‍या कामगिरीचे त्‍यांनी कौतुक केले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button