FIFA World Cup Final : कोट्यवधी चाहत्यांनी अनुभवला ६ गोलचा थरार | पुढारी

FIFA World Cup Final : कोट्यवधी चाहत्यांनी अनुभवला ६ गोलचा थरार

पुढारी ऑनलाईन डेस्क : थरारक… रोमहर्षक… श्वासरोधक आणि उत्कंठावर्धक अशा फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात मेस्सीचा मॅजिक अखेर चाललाच… त्याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षांनंतर फिफा विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावला.  अर्जेंटिनाने फ्रान्सवर पेनल्टी शूटआऊटवर 4-2 (3-3) गोल फरकाने मात करीत सोन्याने मढवलेला फिफा विश्वचषक उंचावला. या अंतिम सामन्यात कोट्यवधी चाहत्यांनी ६ गोलचा थरार अनुभवाला.

120 मिनिटे चाललेला संग्राम आणि त्यानंतरचा पेनल्टी शूटआऊटचा थरार अवघ्या जगाने डोळे विस्फारून पाहिला. शेवटचा वर्ल्डकप खेळणार्‍या मेस्सीने दोन गोल करून संघाचे आणि स्वत:चे विश्वविजयाचे स्वप्न साकारले. अर्जेंटिनाने यापूर्वी 1978 आणि 1986 साली विश्वविजेतेपद मिळवले होते. विशेष म्हणजे 2002 पासून वर्ल्डकप युरोप खंडातच राहिला होता. परंतु आता अर्जेंटिनाने तो दक्षिण अमेरिकेत नेला. गतविजेता फ्रान्सचे सलग दोनदा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. एम्बाप्पेला गोल्डन बूट तर मेस्सीला गोल्डन बॉल देण्यात आला.

असे झाले गोल

23 वे मिनिट… 21व्या मिनिटाला फ्रान्सच्या डिम्बेलेने डी मारियाला पेनल्टी क्षेत्रात पाडले अन् अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. अपेक्षांचे प्रचंड ओझे घेऊन मेस्सी पेनल्टी घ्यायला आला अन् त्याने करिष्मा करून दाखवला. अर्जेंटिनाने 23व्या मिनिटाला गोल केला. मेस्सीचा या स्पर्धेतील हा सहावा गोल ठरला. अर्जेटिना 1-0 ने आघाडीवर

36 वे मिनिट… सांघिक खेळ कसा करावा याचे उत्तम उदाहरण 36व्या मिनिटाला अर्जेंटियन खेळाडूंनी दाखवून दिले. मॅक एलिस्टर चेंडू ज्या पद्धतीने घेऊन पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेला त्याला रोखण्यासाठी फ्रान्सची फौज उभी राहिली, परंतु त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे हे दिसताच त्याने चेंडू डी मारियाला दिला अन् अर्जेंटिनाची आघाडी 2-0 अशी झाली. मारियाने 2022, 2018 व 2014 या तीनही वर्ल्डकप स्पर्धेच्या नॉक आऊट सामन्यात गोल केले आहेत.

80 वे मिनिट… 79व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या निकोलस ओटामेंडीने पेनल्टी क्षेत्रात स्टीव्ह मँडांडाला पाडले अन् फ्रान्सला पेनल्टी मिळाली. कायलिन एमबाप्पेने गोल करून फ्रान्सचे आव्हान जिवंत ठेवले.

81 वे मिनिट… 81व्या मिनिटाला एम्बाप्पेने अर्जेंटिनाची बचावभिंत भेदली अन् सामना 2-2 असा बरोरीत आणला. जबरदस्त व्हॉलीद्वारे त्याने हा गोल केला.

108 वे मिनिट… 107 व्या मिनिटाला आक्रमक मेस्सीचा गोल रोखला गेला. पुढच्याच मिनिटाला अर्जेंटिनाने गोल केला. मार्टिनेझचा तो प्रयत्न गोलरक्षकाने रोखला, परंतु चेंडूवर ताबा राखता न आल्याने मेस्सीला गोल संधी मिळाली आणि अर्जेंटिनाने 3-2 अशी आघाडी घेतली.

 

Back to top button