INDvsBAN Test : बांगला देश फॉलोऑनच्या छायेत | पुढारी

INDvsBAN Test : बांगला देश फॉलोऑनच्या छायेत

चट्टोग्राम, वृत्तसंस्था : टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या कसोटीत (INDvsBAN Test) बांगला देशवर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. भारताच्या 404 धावांचा पाठलाग करताना बांगलादेश दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केवळ 8 बाद 133 धावांपर्यंतच मजल मारू शकला. यजमान संघाला फॉलोऑनपासून वाचवण्यासाठी 72 धावांची गरज आहे. मात्र, बांगला देशच्या फलंदाजांनी आतापर्यंत ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, ते पाहता फॉलोऑनमधून त्यांची सुटका चमत्कारापेक्षा कमी असणार नाही.

भारतीय संघाचा पहिला डाव 404 धावांवर संपला. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या बांगला देशची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सिराजने डावखुरा सलामीवीर नजमुल हुसेन शांतोला गोल्डन डकवर बाद केले. विकेटकिपर पंतने त्याचा झेल पकडला. उमेशने चौथ्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर यासिर अलीला (4) बोल्ड केले. यानंतर सिराजने आपल्या गोलंदाजीला धार देत 13.2 आणि 17.2 व्या षटकात अनुक्रमे लिटन दास (24), झाकीर हसनला (20) तंबूत पाठवले. त्याने अक्षरश: बांगला देशच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडले. यानंतर कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जादूने उर्वरित बांगला देशी फलंदाजांना नाचवले.

22 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या कुलदीपने पहिल्याच षटकात विकेटची चव चाखली. त्याने बांगला देशचा कर्णधार शकीब अल हसनला (3) आपला पहिला बळी बनवला. त्यानंतर नरुल हसन (16), मुशफिकर रहीम (28), तैजुल इस्लाम (0) यांना कुलदीपने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. खेळाच्या दुसर्‍या दिवशी भारताचा हा चायनामन गोलंदाज 10 षटकांत 33 धावा देऊन सर्वाधिक 4 बळी घेण्यात यशस्वी झाला. बांगला देशला लागलेल्या पहिल्या 4 धक्क्यांपैकी सिराजने एकट्याने 3 बळी घेतले.

तत्पूर्वी, भारत आणि बांगला देश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी भारताने सहा गडी गमावत 278 धावा केल्या होत्या. दुसर्‍या दिवशी श्रेयस अय्यर आणि आर. अश्विन फलंदाजीला आले, मात्र अय्यरला 86 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. परंतु त्यावेळी 300/315 धावाही दुरापस्त वाटत असताना कुलदीप आणि अश्विन यांनी 82 धावांची भागीदारी केल्यामुळे भारताला चारशे धावांचा टप्पा गाठता आला. त्याचवेळी आर. अश्विननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या.

फॉलोऑन देणार का? (INDvsBAN Test)

यजमान संघ फॉलोऑन खेळतो की नाही हे टीम इंडियाच्या थिंक टँकच्या निर्णयावर अवलंबून असेल. अलीकडच्या काळात, टीम इंडियाने विरोधी संघांना फॉलोऑन न देण्याची परंपरा केली आहे, परंतु चट्टोग्रामच्या वेगवान खेळपट्टीवर, भारतीय कर्णधार के.एल. राहुल आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ही परंपरा खंडित करू शकतात. दोन दिवसांच्या खेळानंतर भारत सध्या ज्या टप्प्यावर पोहोचला आहे, तिथून तो फक्त आणि फक्त विजयच मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा :

Fifa World Cup : इतिहास घडवून मोरोक्कोची ‘एक्झिट’

National Sports २०२२ : टेनिस मधील पुरुष गटातही महाराष्ट्राची विजयी सलामी

Back to top button