Fifa World Cup : इतिहास घडवून मोरोक्कोची ‘एक्झिट’ | पुढारी

Fifa World Cup : इतिहास घडवून मोरोक्कोची ‘एक्झिट’

Fifa World Cup : गतविजेत्या फ्रान्सने मोराक्कोचा 2-0 गोलने पराभव करत पुन्हा एकदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. जायंट किलर मोरोक्कोची या विश्वचषकातील स्वप्नवत वाटचाल या पराभवामुळे थांबली. अंतिम सामन्यात फ्रान्सचा मुकाबला बलाढ्य अर्जेंटिनाशी होईल. आजपर्यंतच्या विश्वचषक इतिहासात 1934 व 1938 साली इटली आणि 1958 व 1962 साली ब्राझील वगळता कोणत्याही देशाने आजपर्यंत सलग दोन विश्वचषक स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलेले नाही. गेल्यावेळी 2018 चे विजेतेपद फ्रान्सने मिळवलेले आहे.

यावर्षी इटली आणि ब्राझीलप्रमाणे फ्रान्स इतिहासाची पुनरावृत्ती करेल की शेवटची विश्वचषक स्पर्धा खेळणारा मेस्सीचा अर्जेंटिना संघ 1986 नंतर पुन्हा एकदा विश्वचषक उंचावतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अंतिम सामना नक्कीच रोमांचक असेल. मेस्सी आणि त्याचा संघ विजेतेपदासाठी प्रयत्न करतील तर एम्बाप्पे आणि कंपनी फ्रान्सला सलग दुसरे विजेतेपद मिळवून देण्यास उत्सुक असेल.

Fifa World Cup : विश्वचषकाबरोबरच ‘गोल्डन बूट मिळविण्यासाठीसुद्धा मेस्सी, एम्बाप्पे, अल्वारझ, जिरॉड या खेळाडूंमध्ये चढाओढ असेल. या स्पर्धेत अनेक चांगल्या संघांची एक्सिट झाली असली तरी दोन दर्जेदार आणि पात्र संघ अंतिम फेरीत एकमेकांबरोबर खेळतील. फ्रान्स आणि मोरोक्को हे दोन्ही संघ नवा इतिहास रचण्यासाठी उपांत्य फेरीत एकमेकांबरोबर खेळत होते. फ्रान्स सलग दुसर्‍या वर्षी अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार होते, तर मोरोक्कोे प्रथमच अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी उत्सुक होते. फ्रान्स 4-2-3-1 या तर मोरोक्कोे 5- 4-1 या फॉर्मेशने मैदानात उतरले.

फ्रान्सकडे एम्बाप्पे, ग्रीझमन, जिरॉड यांच्या रूपात दर्जेदार आणि बलाढ्य संघ होता तर मोरोक्कोकडे हकिमी, एन नाझरी, बुनो यांच्यासारखे युवा खेळाडू होते. सामना सुरू झाल्यानंतर पाचव्या मिनिटाला अंटोनिओ ग्रीझमनच्या एका चांगल्या चढाईवर मिळालेल्या संधीत फ्रान्सचा लेफ्ट बॅक थीओ हर्नांडेजने गोल नोंदवत फ्रान्सला 1-0 अशा आघाडीवर नेले. सोळाव्या मिनिटालाफ्रान्सकडून झालेल्या कऊाउंटर अटॅकमध्ये ऑलिव्हर जिरॉडने मारलेली किक गोलपोस्टवर आदळली. फ्रान्सने बचावात्मक धोरण अवलंबत काऊंटर अटॅकवर भर दिला होता. तर मोरोक्कने आक्रमक रणनीती अवलंबली होती. यानंतर मोरोक्कोने सामन्यावर नियंत्रण मिळवत फ्रान्सच्या गोलपोस्टवर धडका मारल्या.

Fifa World Cup : मोरोक्कोेच्या पाच बचावपटूंमधील राईट बॅक आणि लेफ्ट बॅक पुढे सरकून आक्रमणास मदत करत असल्यामुळे राहिलेल्या तीन बचावपटूंवर अतिरिक्त भार पडत होता. त्यामुळेच फ्रान्सने काऊंटर अटॅकवर भर देत दोन-तीन चांगली आक्रमणे केली, पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. पहिल्या हाफमध्ये मोरोक्कोेच्या आक्रमक रणनीतीपुढे फ्रान्स संघ दबावाखाली खेळताना दिसत होता. कोनाटे आणि कर्णधार हयुगो लोरीस यांच्या उत्कृष्ट बचावामुळे मोरोक्कोला गोल करण्यात अपयश येत होते. मोरोक्कोन सतत आक्रमण करत असले तरी फ्रान्सचे सर्वच खेळाडू अतिशय शांत आणि संयमाने खेळताना दिसले. त्यामुळे त्यांच्याकडून चुका झाल्या नाहीत. स्पेन, पोर्तुगाल संघांनी केलेल्या चुकांचा फायदा करून घेत मोरोक्कोेने मोठे विजय मिळवले होते. पण ही संधी फ्रान्सने त्यांना दिली नाही.

सामन्याच्या 78 व्या मिनिटाला बदली खेळाडू कोलो मोनी याने फ्रान्ससाठी दुसरा गोल नोंदवत संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. संपूर्ण सामन्यात मोरोक्कोेला तीन-चार चांगल्या संधी मिळाल्या होत्या ज्याचे गोलमध्ये रूपांतर होऊ शकले असते, पण फ्रान्सच्या संयमी बचावामुळे मोरोक्कोेचा गोल झाला नाही. एकूण सामन्यात जवळजवळ 60 टक्के पझेशन मोरोक्कोेकडे होते. दोन्ही संघांकडून गोल होण्यासारखी प्रत्येकी तीन आक्रमणे झाली. यात फ्रान्सकडून दोन गोल झाले तर नशिबाची साथ नसल्यामुळे आणि फ्रान्सच्या भक्कम बचावमुळे मोरोक्कोेचा एकही गोल झाला नाही. मोरोक्को विरुद्ध स्पेन आणि पोर्तुगाल संघाने केलेल्या चुका फ्रान्सने टाळल्या.

Fifa World Cup : स्पेन आणि पोर्तुगाल या दोन्ही संघांकडून फिनिशिंग न झाल्यामुळे गोल मिळाला नव्हता, पण फ्रान्सने फिनिशिंगमध्ये कोणतीही चूक केली नाही त्यामुळे त्यांना दोन गोल करता आले. बचावामध्ये सुद्धा फ्रान्सने चुका केल्या नाहीत. अतिशय शांत आणि संयमी खेळ करत फ्रान्सने हा विजय मिळवला. फ्रान्सचा अनुभवी अंटोनिओ ग्रीझमन या सामन्याचा खरा हिरो ठरला. त्याने आक्रमणास मदत तर केलीच, पण संघाच्या गरजेवेळी डिफेन्सिव्ह मिडफिल्डची भूमिका बजावत मोरोक्कन आक्रमण थोपवण्यास मदतसुद्धा केली. पहिल्या गोलमध्ये त्याने उजव्या फ्लँकमधून दिलेला पास निर्णय होता. मोरोक्कन आक्रमणावेळी त्यांचे पास कट करण्याचे कामसुद्धा ग्रीझमन करत होता. या सामन्यात एम्बाप्पे आणि जिरॉड या दोघांनाही मोरोक्कोने जखडून ठेवले होते. याचा फायदा इतर खेळाडूंनी उठवला.

मोरोक्कोेचा फोकस या दोन खेळाडूंवर असल्यामुळे इतर खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा हर्नांडेज आणि मोनी यांनी फायदा करून घेतला. प्रशिक्षक वालिद रेद्रागोई यांनी मोरोक्कोेची संघ बांधणे अतिशय चांगल्या पद्धतीने केली होती. प्रशिक्षणाचा फार मोठा अनुभव नसताना सुद्धा त्यांनी बलाढ्य संघांविरुद्ध विजय मिळवले. प्रत्येक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्यांनी परफेक्ट गेम प्लॅन तयार केला होता. प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करून त्यानुसार संघाची रणनीती ठरवल्यामुळे त्यांना उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणे शक्य झाले. यात त्यांना नशिबाची साथसुद्धा लाभत गेली. मोरोक्कन फुटबॉल इतिहासात या विश्वचषकातील त्यांची कामगिरी नेहमीच लक्षात राहण्यासारखी आहे.

Back to top button