Andrew Flintoff | अँड्यू फ्लिंटॉफ भीषण कार अपघातात जखमी, एअरलिफ्ट करुन रुग्णालयात दाखल

Andrew Flintoff | अँड्यू फ्लिंटॉफ भीषण कार अपघातात जखमी, एअरलिफ्ट करुन रुग्णालयात दाखल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्यू फ्लिंटॉफ भीषण कार अपघातात जखमी झाला आहे. त्याला या अपघातानंतर एअरलिफ्ट करुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोटारींचा टॉप गियर प्रेझेंटर असलेल्या फ्लिंटॉफला बीबीसी मालिकेसाठी एका भागाचे शूटिंग करत हा अपघात झाला. त्यात अँड्यू फ्लिंटॉफ जखमी झाला. ४५ वर्षीय अँड्यूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण त्याच्या जीवाला धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे. दक्षिण पूर्व इंग्लंडच्या सरे येथील डन्सफोल्ड पार्क एरोड्रोम येथे टॉप गियरच्या चाचणी ट्रॅकवर ही घटना घडली.

"आज सकाळी टॉप गियर चाचणी ट्रॅकवर झालेल्या अपघातात अँड्यू जखमी झाला. त्यानंतर घटनास्थळी तातडीने वैद्यकीय पथकाने धाव घेतली," असे बीबीसीने एका निवेदनात म्हटले आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे आणि आम्ही योग्य वेळी अधिक तपशील देऊ, असेही पुढे नमूद केले आहे.

फ्लिंटॉफ २०१९ पासून एका शोचा को-प्रेझेंटर आहे. शुटिंग दरम्यान झालेल्या भीषण अपघातात तो जखमी झाला. २०१९ मध्येही को-होस्ट्स असलेल्या ख्रिस हॅरिस आणि पॅडी मॅकगिनीस यांच्याविरुद्ध १२४ मैल प्रतितास वेगाने रेस करताना त्याचे मोटरवरील नियंत्रण सुटले होते. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये यॉर्कशायरमधील एल्व्हिंग्टन एअरफील्डवर शुटिंग करत असताना ड्रॅग रेसदरम्यान त्याच्या कारची धडक झाली होती. पण त्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती.

माजी टॉप गियर प्रेझेंटर रिचर्ड हॅमंड याला २००६ मध्ये याच एअरफील्डवर गंभीर अपघात झाला होता. ज्यामुळे तो कोमात गेला होता. फ्लिंटॉफ २०१९ मध्ये होस्ट म्हणून टॉप गियर शोमध्ये सहभागी झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटर असलेल्या फ्लिंटॉफने इंग्लंडसाठी ७९ कसोटी, १४१ वन-डे आंतरराष्ट्रीय आणि सात टी-२० सामने खेळले आहेत. त्याने २००९ मध्ये निवृत्ती घेतली होती. २००५ आणि २००९ च्या इंग्लंडच्या अॅशेस मालिकेतील यशात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news